वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर दि. 10 : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक किरण गिऱ्हे यांनी केले आहे.
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ अंतर्गत वडार समाजाच्या सर्वांगीन विकास व आर्थिक उन्नतीसाठी पैलवान कै. मारुती चव्हाण – वडार आर्थिक विकास महामंडळ व रामोशी समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी – राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ तसेच वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत 1 लाख रुपये थेट कर्ज योजना राबविण्यात येत आहे. सन-2024-25 या आर्थिक वर्षाचे उद्दिष्ट् प्राप्त झाले असुन, 1 लाख थेट कर्ज योजनेमध्ये संपूर्ण कर्ज महामंडळाकडुन दिले जाणार आहे. लाभार्थीने रु.2085/- चा नियमित 48 समान मासिक हप्त्यांमध्ये परतफेड करणा-या लाभार्थीना व्याज अदा करावे लागणार नाही. परंतु थकीत हप्त्यांवर द.सा.द.शे. 4 टक्के व्याजदर आकारण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या), डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, दुसरा मजला सात रस्ता सोलापुर दुरध्वनी क्रमांक – 0217-2992080 येथे संपर्क करावा, जिल्ह्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशष मागास प्रवर्गातील लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनही जिल्हा व्यवस्थापक किरण गिऱ्हे यांनी केले आहे.