शिक्षण हेच सामाजिक क्रांतीचे प्रभावी साधन : हेरंब कुलकर्णी
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : महात्मा फुले यांचे संपूर्ण जीवन सामाजिक समता, शिक्षण आणि मानवमुक्तीच्या ध्यासाने प्रेरित होते. त्यांनी शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन मानून स्त्रीशिक्षण, अस्पृश्यताविरोध, वंचितांच्या हक्कांसाठी तसेच सामाजिक सुधारणांसाठी केलेले कार्य आजही दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन लेखक, विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी केले.
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी संचलित श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी येथे महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दीनिमित्त ‘महात्मा फुले : जीवन व कार्य’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते.
महात्मा फुले यांच्या जीवनकार्याचा विविध अंगांनी वेध घेताना कुलकर्णी यांनी त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, स्त्रीविकास आणि अस्पृश्यताविरोधी कार्याची सविस्तर माहिती दिली. उद्योजक आणि नगरसेवक म्हणून त्यांची भूमिका, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक समाज, त्यांची ग्रंथसंपदा तसेच महात्मा फुले यांच्या कार्यावर आधारित साहित्य व चित्रपट याबाबत त्यांनी अनेक दुर्मीळ व उपयुक्त संदर्भ उपस्थितांसमोर मांडले.
महात्मा फुले यांनी मुलींसाठी शाळा सुरू करून भारतीय समाजव्यवस्थेत सामाजिक परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवली. स्त्री शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक क्रांती घडवून आणण्याचा त्यांचा प्रयत्न तत्कालीन परिस्थितीत अत्यंत धाडसी होता, असे कुलकर्णी यांनी सांगितले. महात्मा फुले व सवित्रीबाई फुले दाम्पत्याने शिक्षण आणि सामाजिक सुधारणांसाठी केलेल्या कार्यातून समता, बंधुता आणि मानवतेचा विचार समाजापर्यंत पोहोचविला, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शीचे खजिनदार मा. जयकुमार शितोळे होते. अध्यक्षीय मनोगतात त्यांनी महात्मा फुले यांच्या जीवनकार्याचा शोध आणि बोध घेऊन विद्यार्थ्यांनी तसेच समाजातील प्रत्येक घटकाने सामाजिक जाणीवेतून कार्यप्रवण व्हावे, असे आवाहन केले.महात्मा फुले यांच्या जीवनकार्याचा इतिहास, त्यामागील सामाजिक संघर्ष आणि त्यांच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता त्यांनी मांडली.
प्रा. डॉ. बी. डी. पारसे यांनी हेरंब कुलकर्णी यांचा परिचय करून दिला. डॉ. राहुल पालके यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. शेख, प्राचार्य व्ही. पी. शिखरे, सामाजिक कार्यकर्ते, प्रा. व्ही. बी. वाघमारे, प्रा. आर. सी . शिंदे, डॉ. अनंत गायकवाड,कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




