पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

0

मराठवाड्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीचा आढावा, चारा, पाणी व वीजपुरवठ्याच्या नियोजनाचे निर्देश मुदतपूर्व पीक कापणी प्रयोग तातडीने पूर्ण करावेत

B1न्यूज मराठी नेटवर्क

लोकप्रतिनिधींच्या सूचनांनुसार कार्यवाही करण्याचे निर्देश, शेतकरी व नागरिकांनी कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नये

नांदेड ,दि. 19 : मराठवाड्यासह राज्यात अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले असून, पावसात खंड पडल्याने शेती पिकांवर परिणाम झाला आहे. संकटग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई व मदत मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर निश्चितपणे प्रयत्न करण्यात येतील. पीक विम्याचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळण्यासाठी मुदतपूर्व पीक कापणी प्रयोग काळजीपूर्वक व अचूकपणे तातडीने पूर्ण करावेत. या प्रक्रियेत कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, असे निर्देश राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज आयोजित बैठकीत दिले. नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील आठही जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीचा आढावा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी ऊर्जा, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, खासदार रामराव वडकुते, खासदार प्रा. रविंद्र चव्हाण, खासदार संजय चव्हाण, खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार सर्वश्री. हेमंत पाटील, अमरनाथ राजूरकर, सईद खान, कैलास पाटील, बाबूराव कदम कोहळीकर, भिमराव केराम, राजेश पाटील, राजू नवघरे, प्रताप पाटील चिखलीकर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इंद्र मणी, कृषी आयुक्त सुरज मांढरे, उपायुक्त रिता मैत्रेवार, वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित होत्या. तर खासदार अशोकराव चव्हाण, खासदार अजित गोपछडे, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार बजरंग सोनवणे, खासदार डॉ. कल्याण काळे यांच्यासह विविध विधानसभा मतदार संघातील आमदार दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

मराठवाड्यातील 76 तालुक्यांमध्ये कमी पाऊस व पावसातील खंडामुळे पीक नुकसान, चारा टंचाई तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्क राहून आवश्यक उपाययोजना कराव्यात. शेतकरी अडचणीत असल्याने त्यांच्याशी संवेदनशीलतेने वागावे, त्यांच्या अडचणी व म्हणणे समजून घ्यावे. शासन शेतकऱ्यांच्या सेवेसाठी असून, त्यांना आर्थिक पाठबळ देणे ही शासनाची जबाबदारी आहे, असे कृषी मंत्री भरणे यांनी सांगितले.

जिल्ह्यात पिण्याचे पाणी, चारा तसेच अखंडित वीजपुरवठ्याचे योग्य नियोजन करावे. संकटाच्या काळात शासन शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात 56 लाख शेतकऱ्यांना 40 हजार 385 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात येणार असून, कर्जमाफी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक सहकार्य करावे. कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर झाली असून, उर्वरित शेतकऱ्यांच्या त्रुटींची पूर्तता होताच टप्प्याटप्प्याने कर्जमाफी देण्यात येईल. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना नव्याने कर्ज उपलब्ध करून द्यावे तसेच कर्जमाफीची यादी संबंधित बँकांमध्ये प्रसिद्ध करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
500दुष्काळी गावांच्या यादीबाबत खोटी माहिती व अफवा पसरविणाऱ्या बातम्यांवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये. सॅटेलाईटच्या माध्यमातून विमा संरक्षणाबाबतची बाब तातडीने केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात येईल. चारा व पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे, असेही कृषी मंत्री भरणे यांनी सांगितले.

लोकप्रतिनिधींनी पीक नुकसान, चारा व पाणीटंचाई, जलजीवन मिशन, जलसंधारण, अखंडित वीजपुरवठा तसेच इतर विविध विषयांबाबत मांडलेल्या सूचनांची नोंद घेऊन त्यावर प्रभावी अंमलबजावणी प्रशासनाने करावी. शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून, प्रशासनातील सर्व घटकांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश कृषी मंत्री भरणे यांनी दिले.

ऊर्जा राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर म्हणाल्या की, राज्यात सध्या विजेचा तुटवडा नाही. त्यामुळे कोणत्याही जिल्ह्यात लोडशेडींग होणार नाही याची दक्षता घेतली जाईल.

यावेळी नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे, लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह उपस्थित लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आपली मते मांडली. बैठकीचे प्रास्ताविक कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी केले. यावेळी लातूर विभागाचे कृषी सहसंचालक, छत्रपती संभाजीनगर विभागाचे कृषी सहसंचालक तसेच संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थितीची माहिती सादर केली.

बैठकीस नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार, परभणीचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, जालना जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, बीडचे जिल्हाधिकारी , छत्रपती संभाजीनगरचे अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकिणे यांच्यासह सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या