डॉ. कृष्णा मस्तूद यांचा विद्यार्थ्यांना सकारात्मक जीवनदृष्टीचा मंत्र; ‘आपले मन, आपले वर्तन’ विषयावरील व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
मनाशी संवाद साधा, स्वतःला विचारा; योग्य असेल तर करा, चुकीचे असेल तर थांबा!
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : “मनात विचार आला म्हणून प्रत्येक विचार कृतीत आणायचा नसतो. क्षणभर थांबा, आपल्या मनाला विचारा‘ मी जे करतोय ते बरोबर आहे का?’ योग्य असेल तर नक्की करा; पण चूक असेल तर स्वतःला थांबवा. मनाला प्रश्न विचारण्याची ही सवय म्हणजेच मनाचा व्यायाम आहे,” असा अत्यंत साधा, पण जीवनाला योग्य दिशा देणारा मंत्र मानसोपचार तज्ज्ञ डॉ. कृष्णा मस्तूद यांनी विद्यार्थ्यांना दिला.
जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त लायन्स क्लब बार्शी रॉयल व बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच IQAC व राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या सहकार्याने ‘आपले मन, आपले वर्तन’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. मस्तूद यांनी आपल्या अभ्यासपूर्ण आणि संवादात्मक शैलीत विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला.
‘मनोबुद्ध मनावर’ या पुस्तकातील विचारांच्या आधारे त्यांनी मन, विचार, भावना आणि वर्तन यांचा परस्परसंबंध उलगडून सांगितला. मनावर नियंत्रण म्हणजे मनातील विचार दाबणे नव्हे, तर त्या विचारांना समजून घेऊन योग्य-अयोग्याचा निर्णय घेणे होय, असे त्यांनी स्पष्ट केले. नकारात्मक विचार, भीती किंवा अडचणी आल्या म्हणून जीवन थांबत नाही; त्या परिस्थितीत स्वतःला समजून घेणे, कोणाशी तरी बोलणे आणि योग्य मार्गदर्शन घेणे महत्त्वाचे आहे, असा सकारात्मक संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
विशेष म्हणजे व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांनी डॉ. मस्तूद यांच्याशी उत्स्फूर्त संवाद साधत “मनाचा व्यायाम नेमका कसा करावा?”, “आत्मविश्वास कसा वाढवावा?”, “भीती वाटत असेल तर त्यावर मात कशी करावी?”, “भीती कायमची कशी दूर करावी?”, “मोबाईलपासून स्वतःला दूर कसे ठेवावे?” यांसह अनेक प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नाला डॉ. मस्तूद यांनी अत्यंत सहज, समर्पक आणि व्यवहार्य पद्धतीने उत्तरे देत मार्गदर्शन केले. त्यामुळे कार्यक्रमाला व्याख्यानापेक्षा विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्नांना वाट करून देणाऱ्या अर्थपूर्ण संवादाचे स्वरूप प्राप्त झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लब बार्शी रॉयलचे अध्यक्ष मा. ला. मंगेश बागुल होते, तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्राचार्य डॉ. ए. बी. कदम उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. एम. ए. ढगे, प्रा. के. एम. माळी, IQAC समन्वयक डॉ. बी.डी. लांडे, वाणिज्य विभाग समन्वयक के. बी. चपटे यांच्यासह वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती रेवडकर यांनी केले.
“मनाला समजून घ्या, मनाशी बोला आणि जीवनातील प्रत्येक परिस्थितीला सकारात्मकतेने सामोरे जा,” हा डॉ. मस्तूद यांच्या मार्गदर्शनाचा मूलमंत्र विद्यार्थ्यांच्या मनावर ठसा उमटवून गेला. जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त आयोजित हा उपक्रम विद्यार्थ्यांना आत्मपरीक्षण, आत्मविश्वास, संवाद आणि सकारात्मक विचारांची दिशा देणारा ठरला.




