अकोल्यात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; ४.१५ लाखांचे ५९३ किलो कालबाह्य तूप जप्त, दोन दुकानांचे परवाने निलंबित
B1न्यूज मराठी नेटवर्क
अकोला : शहरातील खाद्य आस्थापनांची अन्न व औषध प्रशासनाने दोन दिवसीय विशेष तपासणी मोहीम राबवून मोठी कारवाई केली आहे. अकोला शहरातील दोन नामांकित फर्म्समध्ये विक्रीसाठी ठेवलेला तब्बल ५९३ किलो कालबाह्य तुपाचा साठा जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत ४,१५,०९३ रुपये आहे. या गंभीर निष्काळजीपणाबद्दल दोन्ही आस्थापनांचे अन्न परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत.
एफडीएचे सहआयुक्त दे. गो. वीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ आणि १७ सप्टेंबर २०२६ रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने शहरातील विविध खाद्य प्रतिष्ठानांची तपासणी केली. त्यात पूर्वा मार्केटिंग येथील तपासणीत येथे १५ वेगवेगळ्या प्रकारच्या कालबाह्य तुपाचा साठा आढळून आला. प्रशासनाने ४५८ किलो तूप जप्त केले असून त्याची अंदाजे किंमत ३,३४,०९३ रुपये आहे.
मेसर्स लीलाधर जगजीवन येथे १७ सप्टेंबर रोजी या फर्मवर छापा टाकण्यात आला. येथे ‘वटुला प्रीमियम घी’ या ब्रँडचा कालबाह्य साठा विक्रीसाठी ठेवलेला आढळला. पथकाने येथील १३५ किलो तूप जप्त केले असून त्याची किंमत ८१,००० रुपये आहे.
ही धडक कारवाई अमरावती विभागाचे सह आयुक्त (अन्न) एस. डी. केदारे आणि अकोल्याचे सहाय्यक आयुक्त (अन्न) डी. जी. वीर यांच्या मार्गदर्शनात अन्न सुरक्षा अधिकारी आर. डी. सोळंके व कि. ह. बोरचाटे यांच्या पथकाने केली.




