सत्तेचा वापर समाजाच्या कल्याणासाठीच ; सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणे हाच संविधानाचा मार्ग – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

येळी येथे वैशाली बुद्ध विहाराचे उत्साहात लोकार्पण
B1न्यूज मराठी नेटवर्क
धाराशिव : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे आपण गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त झालो आणि स्वातंत्र्य,समता व बंधुतेच्या मार्गावर वाटचाल करू लागलो.संविधानाने दाखविलेल्या मार्गावर चालताना समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन पुढे जाणे आवश्यक आहे. सत्ता ही केवळ अधिकार गाजविण्यासाठी नसून समाजाच्या कल्याणासाठी असते. सत्तेचा वापर सर्वसामान्यांच्या कल्याणकारी कामांसाठी करण्यात येत आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही जिवंत ठेवणारे येळी हे गाव सामाजिक समता आणि बंधुतेचा आदर्श निर्माण करीत असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केले.
आज ५ नोव्हेंबर रोजी उमरगा तालुक्यातील येळी येथे आयोजित वैशाली बुद्ध विहार लोकार्पण सोहळा व वर्षावास समारोप कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यसभा खासदार श्रीमती. ज्योती वाघमारे होत्या. यावेळी मंचावर अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष डॉ. उपगुप्त महाथेरो, भदंत धम्मसार थेरो,भदंत सुमंगल, भदंत सुमेध नागसेन यांची प्रमुख तसेच प्रमुख अतिथी म्हणून आमदार बसवराज पाटील, आमदार प्रवीण स्वामी, माजी खासदार रवींद्र गायकवाड,माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हा परिषद उपाध्यक्ष उषा गायकवाड, पंचायत समिती सभापती ॲड. आकांक्षा चौगुले, उमरगा नगरपरिषद नगराध्यक्ष किरण गायकवाड,येळीचे सरपंच निवृत्ती पवार व उपसरपंच नेत्रावती कांबळे उपस्थित होते.
प्रारंभी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते फीत कापून वैशाली बुद्ध विहाराचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी मान्यवरांची उपस्थिती होती.
शिरसाट म्हणाले की,येळी हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जिवंत ठेवणारे गाव आहे. संविधानाने दिलेल्या मार्गावर आपण वाटचाल करीत आहोत. एकेकाळी गुलामगिरीचे जीवन जगणारा समाज आज त्या गुलामगिरीतून मुक्त झाला आहे.ही मुक्ती आणि समाजाला मिळालेली नवी दिशा संविधानामुळेच शक्य झाली आहे. असे ते म्हणाले.
सर्वांना सोबत घेऊन चालणे, सामाजिक एकोपा जपणे आणि समाजाच्या कल्याणासाठी कार्य करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.याच भूमिकेतून सत्तेचा वापर कल्याणकारी कामांसाठी करण्यात येत असल्याचे शिरसाट यांनी सांगितले.
यावेळी आमदार बसवराज पाटील म्हणाले की,येळी गावाने या परिसरात भगवान गौतम बुद्धांचे विचार सातत्याने रुजविण्याचा आणि समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. या कार्याबद्दल येळीकरांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.भगवान गौतम बुद्धांच्या विचारांची आज केवळ देशालाच नव्हे,तर संपूर्ण जगाला गरज आहे.त्यांचे सर्वसमावेशक विचार समाजाला एकत्र आणणारे आणि मानवतेची शिकवण देणारे आहेत.हे विचार पुढे नेण्याचे काम आपण सर्वजण करीत आहोत.यापुढेही बुद्धांचे विचार अधिक व्यापक स्वरूपात समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. असे पाटील म्हणाले
उमरगा तालुक्याच्या सामाजिक सलोख्याचा गौरव करताना पाटील म्हणाले की,हा तालुका जात,धर्म आणि पंथाच्या पलीकडे जाऊन विचार करणारा आहे.सर्व धर्मांच्या विचारांचा आदर करून ते पुढे नेण्याची परंपरा या तालुक्याने जपली आहे.समाजात बंधुभाव, एकोपा आणि सर्वसमावेशकतेची भावना निर्माण करण्याचे कार्य सातत्याने होत आहे.वैशाली बुद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा आणि वर्षावास समारोप यांसारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून भगवान गौतम बुद्धांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचत आहेत.नव्या पिढीला योग्य दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य अशा कार्यक्रमांतून होत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी खासदार श्रीमती. ज्योती वाघमारे,आमदार प्रवीण स्वामी,माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यासह अन्य मान्यवरांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक वैशाली बुद्ध विहार चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अजय कांबळे यांनी केले.
येळी येथे वैशाली बुद्ध विहाराचे लोकार्पण आणि वर्षावास समारोप कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.भगवान गौतम बुद्धांचे विचार,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली संविधानिक मूल्ये आणि सामाजिक समतेचा संदेश यांमुळे या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. कार्यक्रमाला येळी गावासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




