पिकांची स्थिती पाहण्यासाठी जिल्हाधिकारी शेतात पीक परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवा – जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.
B1न्यूज मराठी नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर, दि.१५ : जिल्ह्यातील पर्जन्यमानाची स्थिती अद्यापही हवी तशी सुधारलेली नाही. याबाबत कृषी, महसूल, ग्रामविकास या व अन्य सर्व यंत्रणांनी पर्यन्यमान व पीक स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवावे,असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज दिले.
जिल्ह्यातील पीक स्थिती व अनियमित पर्जन्यमानामुळे उद्भवलेल्या स्थितीबाबत आज जिल्हाधिकारी गौडा यांनी आढावा घेतला. दरम्यान आज सकाळी जिल्हाधिकारी गौडा यांनी खडकनारळा ता. गंगापूर येथे जाऊन प्रत्यक्ष पिकांची पाहणीही केली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, मनपा उपायुक्त अंकुश पांढरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी तसेच अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यापर्यंत ४१७.३ मि.मी इतके पर्जन्यमान झाले आहे. सद्यस्थितीत कापूस, मका, सोयाबीन या पिकांवर कमी पर्जन्यमानाचा परिणाम झाला असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात पशुधनासाठी चारा हा पुरेसा उपलब्ध आहे. १० मार्च २०२७ पर्यंत चारा पुरेल असेही सांगण्यात आले. जिल्ह्यात १६ मध्यम प्रकल्प आहेत त्यात २९.९५ टक्के साठा आहे. ९९ लघु प्रकल्प आहेत त्यात ३४.८८ टक्के जलसाठा आहे. जायकवाडी या सर्वात मोठ्या प्रकल्पात यंदा अद्याप पर्यंत ८६.७९ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. जिल्हाधिकारी गौडा म्हणाले की, यंदाची पर्जन्यमानाची स्थिती पाहता पीक स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. त्याबाबत संबंधित यंत्रणांनी दक्ष रहावे,असे निर्देशही त्यांनी दिले.




