सध्या जाती-जातीत मतभेद ही चिंतेची बाब : डॉ. मच्छिन्द्र सकटे
बार्शीत दलितमित्र गौरव पुरस्काराचे वितरण
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : आज राज्यासह सर्वत्र जातीपातीवरून राजकारण सुरु आहे, तर कुठे आरक्षणावरून वादविवाद सुरु आहे, ही चिंतेची बाब आहे, परंतू समाजातील सर्वच जातीधर्मातील लोकांना एकाच विचारात गुंफण्याचे काम दलित महासंघ दलित मित्र पुरस्काराच्या रूपातून करत असल्याचे प्रतिपादन लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी रविवारी केले.
येथील स्व. यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवनात दलित महासंघाच्यावतीने दलित मित्र गौरव पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विधानपरिषदेचे आमदार राजेंद्र राऊत, शिवशक्ती बँकेचे चेअरमन डॉ. प्रकाश बुरगुटे, तहसीलदार एफ. आर. शेख, दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनील अवघडे, शहराध्यक्ष संदीप अलाट, संगीतराव शिंदे, निलेश खुडे, ऍड. अमोल आलाट, नगरसेवक संदेश काकडे, प्रकाश माने, शंकर वाघमारे, श्रीधर कांबळे उपस्थित होते.
यावेळी प्रा. डॉ. सकटे म्हणाले, वेगवेगळ्या समाजातील लहानपणापासून जिवलग मैत्री असलेले मित्र आरक्षणाच्या वादावरून एकमेकांकडे संशयाने पाहू लागले आहेत. त्यामुळे एकमेकात मतभेद आणि मनभेद निर्माण होऊ लागले आहेत, हे योग्य नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. सरकारने सर्व समाजातील लोकांशी समन्वयाने आणि सामंजसस्याने भूमिका घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा, असे आवाहनही यावेळी डॉ. सकटे यांनी केले.
यावेळी कार्यक्रमात विधानपरिषदेवर निवड झाल्याबद्दल आ. राजेंद्र राऊत यांचा सन्माचिन्ह, मानपत्र शाल आणि पुष्पगुच्छ देऊन डॉ. सकटे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आ. राऊत म्हणाले, थोर महापुरुषांना सध्या जातीत जखडून ठेवले जात आहे. यामुळे माझ्या सारख्या राजकारणी लोकांनाही परिणाम भोगावे लागते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख यांचे विचार महान होते ते विसरता येणार नाही असे प्रतिपादन केले.
यांचा झाला सन्मान …
प्रा. विलास जगदाळे यांना जीवनगौरव, कीर्तनकार ह. भ. प. शिवलीला पाटील यांना विशेष गौरव तर डॉ. संजय अंधारे यांना सेवा पुरस्काराने सन्मानित केले तर सुभाष चव्हाण, रवींद्र राऊत, प्रशांत कथले, संतोष मोळवने, अप्पासाहेब लोखंडे, नितीन पाटील, अजित डुंगुरवाल, ऍड. राहुल पाटील, तुषार बोकेफोडे, धनंजय धावारे, पञकार धैर्यशील पाटील आणि उमेश पवार यांना सन्मानपत्र सन्मानपत्र देऊन दलितमित्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर तहसीलदार एफ आर शेख यांची उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल आणि बार्शीचा सुपुत्र ऋतिक आगरकर हा एमपीएससी परीक्षेत राज्यात प्रथम आल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. तर विधान अलाट, चाणक्य अलाट ,सारंग अवघडे आणि संस्कृती पवार यांचा दहावी बारावी परीक्षेत यश मिळवल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.





