राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त माय भारत केंद्राकडून विविध उपक्रमांचे आयोजन
B1न्यूज मराठी नेटवर्क
अमरावती : माय भारत केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त 27 ऑगस्ट रोजी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 27 ऑगस्ट रोजी देशभरातील 1600 ठिकाणी सहभागी होणाऱ्या आठ लाखांहून अधिक युवकांना आभाशी माध्यमातून संबोधन करणार आहे. याद्वारे देशभरातील युवक आभासी माध्यमातून एकत्र जुळणार आहेत. पंतप्रधानांच्या संबोधनानंतर येथील पोटे पाटील महाविद्यालय आणि बियाणी महाविद्यालयात प्रवेश सकाळी 10 वाजता कार्यक्रम होणार आहे. या अंतर्गत युवक संवाद व विविध सहभागात्मक उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
माय भारत स्वयंसेवक आणि स्थानिक खेळाडू यांच्यात विशेष युवा संवाद सत्र आयोजित करण्यात येणार आहे. गेल्या 12 वर्षांत भारताच्या क्रीडा पायाभूत सुविधांमध्ये तसेच क्रीडा क्षेत्राच्या विकासात झालेल्या परिवर्तनावर चर्चा करण्यात येणार आहे. अमरावती जिल्ह्यातील युवक, माय भारत स्वयंसेवक, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, महाविद्यालयीन विद्यार्थी, खेळाडू आणि क्रीडा क्षेत्राशी संबंधित व्यक्तींनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन माय भारत केंद्र, अमरावती आणि राष्ट्रीय सेवा योजना, अमरावती यांच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, युवक मंडळे, स्वयंसेवी संस्था तसेच 15 ते 29 वर्षे वयोगटातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा युवक अधिकारी अक्षय निपाणे यांनी केले आहे.





