दिलेला शब्द पाळला ! पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश; साडे सांगवीच्या रस्ता- पुलासाठी २.९० कोटी रुपयांच्या कामास प्रशासकीय मान्यता
B1न्यूज मराठी नेटवर्क
धाराशिव.दि.११ जुलै : धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त साडे सांगवी गावाला भेट देऊन ग्रामस्थांना दिलेले आश्वासन अखेर प्रत्यक्षात उतरले आहे.पालकमंत्री तथा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे राज्य शासनाने साडे सांगवी येथील रस्ता व पुलाच्या बांधकामासाठी २ कोटी ९० लक्ष ५८ हजार रुपये खर्चाच्या कामास प्रशासकीय मान्यता दिली आहे. ग्रामविकास विभागाने १० जुलै २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला असून,साडे सांगवीच्या विकासाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
या निर्णयामागे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा निर्णायक ठरला.त्यांनी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांना पत्र पाठवून साडे सांगवी येथील प्रतिमा-१ ते भोगलगाव साडेसांगवी ते इजिमा -११ या ग्राममार्ग क्रमांक ८० वरील पुलाच्या बांधकामासाठी तातडीने निधी मंजूर करण्याची मागणी केली होती.
या पत्रात त्यांनी नमूद केले होते की, सप्टेंबर २०२५ मधील अतिवृष्टीमुळे साडे सांगवी येथील रस्त्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सप्टेंबर २०२५ रोजी भेट देऊन पुलाच्या बांधकामासाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही सुरू करण्याची सूचना केली.त्यानुसार बांधकाम विभाग,जिल्हा परिषद, धाराशिव यांनी २ कोटी ९० लक्ष रुपये खर्चाचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाकडे सादर केला होता.या प्रस्तावाला तातडीने मंजुरी मिळावी, अशी विनंतीही पालकमंत्री सरनाईक यांनी संबंधित पत्राद्वारे केली होती.
अखेर त्यांच्या या पाठपुराव्याला यश मिळत शासनाने प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.यासंदर्भात पालकमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, “साडे सांगवी गावाला भेट दिली तेव्हा अतिवृष्टीमुळे नागरिकांना होत असलेल्या हालअपेष्टा प्रत्यक्ष पाहिल्या.त्यावेळी ग्रामस्थांना रस्ता आणि पुलाचे काम प्राधान्याने करून देण्याचे आश्वासन दिले होते.आज शासनाच्या प्रशासकीय मान्यतेमुळे ते आश्वासन पूर्ण होत असल्याचा मला आनंद आहे.जनतेला दिलेला शब्द पाळणे हीच आमची कार्यपद्धती आहे.”
सरनाईक पुढे म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देत आहे.
साडे सांगवीसह धाराशिव जिल्ह्यातील विकासकामांना आवश्यक निधी मिळावा यासाठी मी सातत्याने पाठपुरावा केला असून, पुढील काळातही जिल्ह्यातील प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे.”
या कामामुळे साडे सांगवीसह परिसरातील नागरिक,शेतकरी, विद्यार्थी आणि दैनंदिन प्रवाशांना वर्षभर सुरक्षित व अखंड वाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार आहे.विशेषतः पावसाळ्यात वाहतुकीसमोरील अडथळे दूर होऊन ग्रामस्थांचा संपर्क अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.शासनाने दिलेल्या या मंजुरीबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द प्रत्यक्ष कृतीत उतरवल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.





