बार्शी ग्रामीणमध्ये जनगणना प्रक्रियेला प्रारंभ
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : तब्बल १५ वर्षांनंतर जनगणना प्रक्रियेला प्रारंभ झाला असून बार्शी ग्रामीण भागात (बार्शी शहर व वैराग वगळून) ही मोहीम राबविण्यात येत आहे. या जनगणनेसाठी एकूण ४३८ प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली असून ४३ प्रगणक राखीव ठेवण्यात आले असल्याची माहिती चार्ज अधिकारी तथा तहसीलदार एफ आर शेख यांनी दिली.
जनगणना प्रक्रियेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ७३ सुपरवायझर नेमण्यात आले असून ८ सुपरवायझर राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच प्रगणक व सुपरवायझर यांना प्रशिक्षण देण्यासाठी ९ मास्टर ट्रेनर नेमण्यात आले असून त्यांचे प्रशिक्षण पुढील तीन दिवसांत पूर्ण होणार आहे.
या जनगणना मोहिमेचे चार्ज ऑफिसर म्हणून तहसीलदार एफ. आर. शेख तर अतिरिक्त चार्ज अधिकारी म्हणून निवासी नायब तहसीलदार सुभाष बदे हे कामकाज पाहणार आहेत. दरम्यान, ही जनगणना प्रक्रिया दोन टप्प्यांत राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रगणकां मार्फत घर गणना (घर यादी तयार करणे) केली जाणार आहे.
यासाठी नागरिकांना १ मे २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत मोबाईल ॲपच्या माध्यमातून स्वगणना करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानंतर १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ दरम्यान प्रगणक घरोघरी जाऊन घर यादी तयार करणार आहेत. तरी बार्शी ग्रामीण मधील नागरिकांनी प्रगणक आपल्या भागात आल्यानंतर आपली माहिती त्यांना द्यावी असे आवाहन तहसीलदार एफ आर शेख यांनी केले आहे.





