शेखागौरी यात्रेची उत्साहात सांगता

B1न्यूज मराठी नेटवर्क
मालवंडी : बार्शी तालुक्यातील मालवंडी गावचे ग्रामदैवत ‘श्री शेखागौरी’ यात्रेची सांगता मोठ्या उत्साहात झाली.शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या यात्रेत लाखो भाविकांनी सहभाग घेतला होता.
सुरवात देवाच्या घोड्याचा छबिना मंदीरातून निघून तो ग्रामपंचायत समोर रात्रभर ठेवला जातो. ऑर्केस्ट्रा, तमाशा, पारंपारिक सोंगे,पाळणे या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद भाविकांची मोठ्या उत्साहात लुटला.शेखागौरी मंदीरावर केलेली विद्यूत रोषणाईचे विशेष आकर्षण होते. मालवंडीसह विविध गावातील पैलवानांनी मालवंडीच्या मातीत शड्डू ठोकले.सोंगाच्या कार्यक्रमांनी भाविकांमध्ये मोठा उत्सव निर्माण झाला होता.खरेदीसाठी महिलांची झुंबड उडाली होती.पाळण्यात बसण्यासाठी रांगा लागल्या होत्या.ऑर्केस्ट्रा, तमाशा या कार्यक्रमांनी भाविकांचे भरपूर मनोरंजन केले.जवळपास दीड ते दोन कोटीची उलाढाल मालवंडीच्या यात्रेत झाली असून यात्रेत विक्रीसाठी आलेल्या व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.
विविध बँडचा जंगी मुकाबला असल्याने वातावरणात उत्साह निर्माण झाला होता.एस.टी स्टॅन्ड पासून ते शेखागौरी मंदीर, ग्रामपंचायत पर्यंत रंगीबेरंगी लायटिंगच्या माळांनी छत घालून विद्यूत रोषणाई केली होती. दरवर्षी प्रमाणे यंदाही यात्रा कमेटीच्या वतीने काटेकोर नियोजन करण्यात आले होते.सामाजिक बांधिलकी म्हणून यात्रा कमेटीच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.यावेळी शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान केले.सर्व कार्यक्रमांनी यात्रेची सांगता मोठ्या उत्साहात झाली.