युवकांनी बदलाची सुरुवात स्वतःपासून करावी : कासारवाडी एनएसएस शिबिरात डॉ. वीरभद्र दंडे यांचे प्रतिपादन
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी संचलित बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत मौजे कासारवाडी येथे आयोजित सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिरात युवकांना सामाजिक जाणीव व जबाबदारीची जाणीव करून देणारे प्रेरणादायी व्याख्यान संपन्न झाले.
शिबिराच्या चौथ्या दिवशी, मंगळवार दि. २० जानेवारी २०२६ रोजी मा. डॉ. वीरभद्र दंडे यांनी ‘एकात्मता व मानवदर्शन’ या विषयावर मार्गदर्शन करताना, “देश, राज्य, गाव किंवा समाज बदलायचा असेल तर सर्वप्रथम त्या बदलाची सुरुवात स्वतःपासून झाली पाहिजे,” असे ठाम प्रतिपादन केले. आजचा युवक हा केवळ शिक्षणापुरताच मर्यादित न राहता समाजपरिवर्तनाचा सक्रिय घटक झाला पाहिजे, असे त्यांनी आपल्या ओघवत्या व प्रेरणादायी शैलीत स्पष्ट केले.
स्वच्छता, सामाजिक एकोपा, मानवतेची जपणूक आणि लोकसहभाग यांचे महत्त्व विशद करताना डॉ. दंडे यांनी सांगितले की, आपण शिबिराच्या काळात गाव स्वच्छ करतो; मात्र आपण परत गेल्यानंतरही गाव स्वच्छ राहावे, यासाठी ग्रामस्थांना या कार्यात सहभागी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक गावाने आठवड्यातून किमान एक दिवस स्वच्छतेसाठी द्यावा, अशी संकल्पना त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली आणि स्वयंसेवकांना दीर्घकालीन विचार करण्यास प्रवृत्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. अथर्व पांगरे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय कु. प्रणिता नवले हिने करून दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. प्रा. एन. आर. सारफळे सर होते. अध्यक्षीय भाषणात प्रा. सारफळे सर यांनी विद्यार्थ्यांनी शिबिराच्या माध्यमातून गावागावात जाऊन लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणावा, असे आवाहन केले.
या वेळी कार्यक्रम अधिकारी डॉ. एम. ए. ढगे, प्रा. के. एम. माळी, प्राध्यापिका व्ही. पी. पाटील यांच्यासह सुमारे १०० स्वयंसेवक व स्वयंसेविका उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. गायत्री देवळे व कु. निशा पवार यांनी केले, तर आभार कु. श्रावणी वाणी हिने मानले. या व्याख्यानामुळे स्वयंसेवकांमध्ये समाजकार्याची नवी ऊर्जा, आत्मभान व जबाबदारीची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.




