स्पर्धा परीक्षेतील गुणवंतांचा शेळगांवात भव्य सत्कार सोहळा संपन्न
पूर्णतः अराजकीय स्वरूपाचा हा भव्य नागरी सत्कार सोहळा शेळगावात प्रथमच आयोजित करून त्यांच्या पालकांचाही सन्मान केल्याने पालक गहिवरून गेले होते. यामुळे गावकऱ्यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक करून आयोजकांचे धन्यवाद मानले. सदर कार्यक्रमाला आजूबाजूच्या गावातूनही बरेच लोक उपस्थित होते. आणि कार्यक्रमाला महिला वर्गाची संख्या मोठी होती.
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत ८४ व्या क्रमांकासह उत्तीर्ण झालेल्या बार्शी तालुक्यातील शेळगाव (आर) येथील डॉ ऋचा विष्णू गोडगे हिच्यासह विविध स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या गावातील ३८ गुणवंतांचा त्यांच्या पालकांसह भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन काल रविवारी (दि. ४) सायंकाळी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख, वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव आणि सोलापूर रोटरी क्लबचे नवनिर्वाचित संचालक तथा महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे राज्य संयुक्त सचिव विलास कोले या मान्यवरांच्या हस्ते शाल, फेटा, पुष्पहार आणि भेटवस्तू म्हणून छत्रपती शिवाजी महाराज व विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे वाटप करून गौरवण्यात आले.
प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवरायांच्या अर्ध पुतळ्यास अभिवादन करून आणि दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी व्यासपीठावर सत्कारमूर्ती गुणवंतांसह पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता तुकाराम देवकर, माजी उपशिक्षणाधिकारी दादाराव सावंत, शिक्षणमहर्षी लक्ष्मणराव गायकवाड, बार्शी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक व माजी सरपंच वासुदेव गायकवाड, बार्शी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान उपसभापती शिक्षण प्रसारक मंडळाचे बाबा गायकवाड, सरपंच प्रकाश बादगुडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विजय अडसूळ, युवा नेते सुहास अडसूळ, प्रकाश बप्पा गायकवाड आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन बार्शी तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष आणि गावचे पोलीस पाटील ज्ञानदेव नागणे, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे बारामती झोनल सचिव आणि सामाजिक कार्यकर्ते विजय अडसूळ, भाई विलास उबाळे, कैलास साळुंखे आणि समस्त शेळगाव ग्रामस्थांनी केले होते.
‘तणावमुक्त जीवन’ या विषयावर पुण्याचे व्याख्याते अशोक देशमुख यांचे व्याख्यान या प्रसंगी आयोजित केले होते. शिक्षणाधिकारी कादर शेख, उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव, रोटरीचे संचालक विलास कोले, निवृत्त कार्यकारी अभियंता तुकाराम देवकर या मान्यवरांनी आपल्या भाषणात या उपक्रमाचे कौतुक करून उपस्थित गुणवंतांना शुभेच्छा दिल्या आणि इतरांनीही यांचा आदर्श घेऊन पुढे वाटचाल करावे असे आवाहन उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
पालकांच्या वतीने मनोगत व्यक्त करताना विष्णू गोडगे यांनी विद्यार्थ्यांवर पालकांनी दबाव न टाकता त्यांच्याशी मैत्रीचे नाते जोपासून त्यांना विश्वासात घ्यावे. त्यांच्यावर दबाव नसावा मात्र धाक असावा आणि पालकांनी आपल्या पाल्यांना वेळ दिला तर प्रतिकूल परिस्थितीतही ते उज्वल यश संपादन करू शकतात असा आत्मविश्वास व्यक्त केला. गुणवंतांमधून महावितरणच्या सहाय्यक अभियंता रुक्मिणी अडसूळ, डॉ ऋचा गोडगे, डॉ समर्था उबाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे खुमासदार असे सूत्रसंचालन भागवत ताकभाते गुरुजी यांनी, प्रास्ताविक पोलीस पाटील ज्ञानदेव नागणे यांनी तर आभार भाई विलास उबाळे यांनी मानले. सदरचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तानाजी जाधव, शाहू कचरे, श्रीकांत दळवी, नाना गवळी, विष्णू यादव, लहू शिंदे, आबा निकम, रामेश्वर बादगुडे, नागेश बादगुडे, युवा उद्योजक संग्राम उबाळे, श्रीकांत बादगुडे, श्याम सिरसट, संतोष सोनार, कादर शेख, सचिन बादगुडे, नानासाहेब ताकमोगे, मच्छिंद्र गोडगे, प्रफुल्ल गोडगे यांच्यासह समस्त शेळगाव ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.




