प्रस्थापित फॅसिस्ट भांडवली व्यवस्था कष्टकरी कामगार डाव्या चळवळींची प्रतीके उध्वस्त करण्याचा प्रयत्न करीत आहे; डाव्या स्मृती प्रेरणास्थाने प्रतीके जपून ठेवा – सरफराज अहमद
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शंभरावा वर्धापन दिनानिमित्ताने दिनांक 26 डिसेंबर 2025 वार शुक्रवार रोजी आयटक कामगार केंद्र बार्शी येथे व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विळा हातोडा असणारा कष्टकरी वर्गाचा झेंडा कॉम्रेड भारत भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहित करून; कॉम्रेड कार्ल मार्क्स फॅड्रिक ऐंगल्स यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे सरफराज अहमद, मा. भाकप राज्य कार्यकारणी सदस्य कॉम्रेड तानाजी ठोंबरे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष भाकप जिल्हासेक्रेटरी कॉम्रेड डॉ. प्रवीण मस्तुद आदी होते.
यावेळी प्रसिद्ध लेखक व पत्रकार सरफराज अहमद म्हणाले “कष्टकरी वर्गाच्या संघर्षाच्या इतिहासाची साधने हे अत्यंत प्रेरणादायी आहेत नेमकी तीच नष्ट करण्याचा प्रयत्न फॅसिस्ट भांडवली व्यवस्था करीत आहे. डाव्या कामगार चळवळीचे नेते जगन्नाथ शिंदे, मल्लापा धनशेट्टी, कुर्बाण हुसेन, किसान सारडा यांच्या सांडलेल्या रक्तावर सोलापूर स्वातंत्र्याआधी तीन दिवस स्वातंत्र्य उपभोगता आले ; गांधीजींच्या अटकेचा निषेध कामगारांनी केला व इंग्रजांना पळवून लावले हा सोलापूर कम्युन म्हणून नोंद असलेला इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला जात आहे.
कवीकुंजविहारी हे डाव्या विचारांचे प्रेरणास्थान होते त्यांची असणारी हुतात्मा स्मृती मंदिरातील कवितेची कोणशीला उध्वस्त केली गेली आहे. त्यांनी व डाव्या चळवळीतील नेत्यांनी मिळून सोलापुरातील सिंधीची झाडे तोडून कामगारांना नशेपासून दूर केले, बुवा बाबा यांच्यापासून दूर केले, दंगलीपासून रोखले, वृत्तपत्रे सुरू केली असे नैस्तिक अधिष्ठान निर्माण करून दिले. बेगमपुरा भागातील दारूमुतालिया हे डाव्या चळवळीचे अभ्यास केंद्र होते तेथे चळवळीच्या तत्वज्ञानाच्या बैठकीचा अभ्यास केला जात असे. या सर्वांचे फलित म्हणून 1945 साली प्रगतीशिल लेखक संघाचे अधिवेशन होऊन सोलापुरात फैज अहमद फैज , कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे आले. एम.एन. रॉय यांनी मानवतावादी परिषद घेतली त्याला देखील डाव्या चळवळीने साथ दिली.
कुरबान हुसेन यांनी गजलफत हे वर्तमानपत्र चालवले त्यामध्ये लिहिलेल्या अग्रलेखात त्यांनी आम्ही बोलशेवीक क्रांतीचे समर्थक म्हणून आम्हाला जेलमध्ये टाकले जात आहे, कामाचे तास कमी केले पाहिजेत, मालकाच्या नफ्यातून मजुरी चा हिस्सा वाढला पाहिजे, पोटभर अन्न -अंगभर कपडे, चांगली घरे, पेन्शन मिळाली पाहिजे अशी मागणी ते अग्रलेखात करतात. लक्ष्मी विष्णू मिल वर चार हुतात्म्यांनी तिरंगा झेंडा फडकविला याचा बदला म्हणून भांडवली व्यवस्थेने हा इतिहास न विसरता शंभराव्या वर्षीच या इतिहासाचा सूड म्हणून ही चिमणी पाडण्याचा प्रयत्न केला.
कॉम्रेड शाहीर अमर शेख शाहीर फाटे हे सोलापूर येथील आहेत परंतु ते कम्युनिस्ट विचारांचे होते याचा विसर पडावा यासाठी भांडवली व्यवस्था प्रयत्न करीत आहे. सोलापुरात रवींद्रनाथ टागोर हे ज्या बंगल्यात निवासस्थानी होते तेथे गीतांजली महाकाव्य त्यांना सुचले व तेथेच त्यांनी लिहिण्यास सुरुवात केली तत्कालीन कलेक्टर यांनी त्या बंगल्याचे नाव गीतांजली केले परंतु ते नाव आता बदलण्यात आले आहे. सोलापुरातील 1920 सालच्या संप भिमराव जाधव यांनी सुरू केला त्यांचे नाव मिटवण्याचा देखील प्रयत्न भांडवली व्यवस्था करीत आहे.
ग्रोक एआय ॲपने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वातंत्र्यसंग्रामा मध्ये नव्हता असे उत्तर दिल्या नंतर ग्रोक मधील 500 तज्ञांनाकाढून टाकून तेथे आरएसएस ला पाठिंबा व्यक्त करणाऱ्या बसविले गेले आहे; यामागे प्रस्थापित सरकार आहे. डाव्या कामगार कष्टकरी चळवळीच्या स्मृती सर्वांनी मिळून जपा. त्यावर लिखाण करत छोट्या मोठ्या पुस्तकात स्थानिक कार्यकर्त्यांची चरित्रे लिहा” असा महत्त्वाचा सल्ला त्यांनी या वेळेस दिला.
यावेळी कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे म्हणाले “डाव्या चळवळीवर हल्ला करण्याच्या उद्देशाने तयार झालेला फॅसिस्ट हिटलरी विचाराला कम्युनिस्ट पक्षाने निस्तनाभूत करून टाकले आहे; भारतामध्ये असणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना ही फॅसिस्ट विचाराने काम करणारी संघटना आहे ; कष्टकरी वर्गाला सर्व बाजूने उध्वस्त करण्याचा त्यांचा हेतू आहे; पैसेवाल्या व मालक धारजींनी असणाऱ्या ब्राह्मणी भांडवली व्यवस्थेचे ते रक्षक आहेत. याला रोखण्याचे काम पुढील काळामध्ये कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते जोरदार पणाने करतील. शंभर या वर्षांमध्ये संघर्ष हाच आमचा नारा आहे.”असे ते म्हणाले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉम्रेड डॉ. प्रवीण मस्तुद म्हणाले “कार्ल मार्क्स यांनी दिलेल्या कम्युनिस्ट जाहीरनाम्यातून प्रेरणा घेत भारत देशामध्ये श्रमिक वर्गाच्या चळवळीला सुरुवात झाली 1920 साली देशातील पहिली आयटक ही कामगार संघटना सुरू होऊन पुढे 1925 साली कम्युनिस्ट पक्ष स्थापन झाला जो पक्ष सातत्याने कामगार, कष्टकरी, शेतकरी, आदिवासी,दलित, महिला, मजूर ,अल्पसंख्यांक , युवक ,विद्यार्थी यांच्यासाठी काम करत आहे; स्वातंत्र्यसंग्रामामध्ये ब्रिटिशांच्या विरोधामध्ये कडवा संघर्ष करत कम्युनिस्टांनी फाशी स्वीकारली; रक्त सांडले कम्युनिस्ट शहीद झाले; संयुक्त महाराष्ट्राचा रणसंग्राम, गोवा मुक्ती संग्राम , हैदराबाद मुक्तिसंग्राम पाँडेचेरी मुक्तिसंग्राम , चितगाव ब्रिटीश शस्त्रगार लुट, तेलंगणाच्या सशस्त्र शेतकरी लढा , डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या हिंदू कोड बिलाच्या बाजूने उभा राहणे, महिलांसाठी आरक्षणाची निर्मिती, तीन कृषी कायद्यांच्या विरोधामध्ये आंदोलन अशा दैदिप्यमान इतिहासाने भारतीय कम्युनिस्ट पक्ष तेजोमय झाला आहे; कष्टकरी वर्गाचा संघर्ष कष्टकऱ्यांचे राज्य निर्माण होईपर्यंत अविरत चालू राहील”.
यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्राचार्य चंद्रकांत मोरे, प्रा. हेमंत शिंदे , आंबेडकरी चळवळीचे नेते प्रा. डीडी मस्के, पुरोगामी विचार मंचचे रमेश गवळी, प्रा. अशोक वाघमारे , शेतकरी कामगार पक्षाचे कॉ. रविकुमार कानगुडे, पक्षाचे सहसचिव कॉ.अजित लंगडे, कॉ. सतीश गायकवाड , कॉ. राजेंद्र करली , कॉ. महादेव पारसे, पै. मतीन शेख , डॉ. दिलीप कदम , अखिल भारतीय किसान सभेचे कॉ. लक्ष्मण घाडगे , दलित अधिकारांदोलनाचे कॉ. बालाजी शितोळे, ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटल श्रमिक संघ, .बांधकाम कामगार संघटना, अर्धवेळ आरोग्य स्त्री परीचर कर्मचारी संघटना , बार्शी नगरपालिका कंत्राटी कामगार संघटना यांचे आदी कार्यकर्ते उपस्थित होते सूत्रसंचालन कॉ. अनिरुद्ध नखाते यांनी केले. लहू आगलावे, भरत चव्हाण, श्रीकांत सोरेगावकर, आनंद गुरव , प्रमोद मंडलिक, सतीश जामदार , कॉ. शौकत शेख, चंद्रकांत देशमुख, निर्मला सरवदे, प्रमिला शिंदे , सुवर्णा नंदाने, छबुबाई ढोरे , सोनाली कदम, सुनील ढगे, अंजू तेवर आदी पस्थित होते.




