‘व्ही बी- जी राम जी’ च्या माध्यमातून ग्रामपंचायतींनी विकास साधावा- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

0

समडोळीत ‘व्ही बी- जी राम जी’ जनजागृतीसाठी विशेष ग्रामसभा उत्साहात

B1न्यूज मराठी नेटवर्क

सांगली : केंद्र शासनाने नुकत्याच केलेल्या ‘व्ही बी- जी राम जी’ म्हणजेच ‘विकसित भारत – गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन (ग्रामीण)’ या नवीन कायद्याच्या माध्यमातून कामाचे नियोजन ग्रामसभेत ठरविले जाणार आहे. ग्रामपंचायतींमध्ये पारदर्शक, लोकाभिमुख आणि उत्तरदायी प्रशासन निर्माण करणे हा याचा मुख्य उद्देश असून, या माध्यमातून ग्रामपंचायतींनी गावाचा विकास करावा, असे प्रतिपादन पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज केले.

मिरज तालुक्यातील समडोळी येथे ‘व्ही बी- जी राम जी’ कायद्याबाबत जनजागृतीसाठी आयोजित विशेष ग्रामसभेमध्ये ते बोलत होते.

विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार म्हणाले, हा कायदा ‘विकसित भारत @ २०४७’ या राष्ट्रीय दृष्टीकोनाशी सुसंगत असा ग्रामीण विकासाचा ढाचा निर्माण करण्यासाठी आहे. ग्रामीण भारताचे सक्षमीकरण, विकास, संसाधनांचा समन्वय व सर्वसमावेशक प्रगती घडवून आणण्यासाठी हा अधिनियम उपयुक्त ठरणार आहे. शहरांकडे असलेला ओढा व ग्रामीण विकासाच्या विविध गरजा हे सर्व घटक नियोजन करताना विचारात घेतले जातील. या अधिनियमांतर्गत जलसुरक्षेला प्राधान्य, मूलभूत सुविधा, आजीविकेसंबंधी सुविधा आणि तीव्र हवामान घटनांमधून संरक्षण करणारी कामे यांचा समावेश असणार आहे. ही चार क्षेत्रे विकास, सशक्तीकरण, अभिसरण व शाश्वत आजीविकेचा पाया ठरतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले, निधीचे योग्य नियोजन करून स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, वीज, आरोग्य यासारख्या मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यात येईल. तसेच नागरिकांच्या तक्रारींची वेळेत सोडवणूक करण्यासाठी प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा उभी केली जाणार आहे. ऑनलाइन व नोंदणी-आधारित पाठपुराव्यामुळे प्रशासन अधिक गतिमान होईल, असा विश्वास करत त्यांनी समडोळी ग्रामपंचायतीने विविध शासकीय अभियान, स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अभिनंदन केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या