उद्घाटनमहाराष्ट्रयवतमाळ

शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून विकासाची कामे – प्रा.डॉ.अशोक उईके

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीएम किसानचा 19 वा हप्ता जमा , कृषी विज्ञान केंद्रात हप्ता वितरण कार्यक्रमाचे थेट प्रसारण

B1न्यूज मराठी नेटवर्क

यवतमाळ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचा सन्मान वाढविण्यासाठी, त्यांना आर्थिकदृष्ट्या हातभार लावण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरु केली. प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून देशात विकासाची कामे केली जात आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ. अशोक उईके यांनी केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते बिहार मधील भागलपूर येथे आयोजित कार्यक्रमातून पीएम किसान योजनेंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील 2 लाख 93 हजार शेतकऱ्यांसह देशभरातील 9 कोटी 8 लाख शेतकऱ्यांना 22 हजार कोटी रुपयांच्या सन्मान निधीचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण कृषी विज्ञान केंद्रात करण्यात आले होते. त्यावेळी उईके बोलत होते.

कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, पद्मश्री सुभाष शर्मा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख मयूर ढोले, शास्त्रज्ञ डॅा.प्रमोद मगर, राहुल चव्हाण, स्नेहलता भागवत, उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त तसेच शेतकरी शास्त्रज्ञ मंचचे अध्यक्ष जगदीश चव्हाण उपस्थित होते. कृषि विज्ञान केंद्र व कृषि विभागाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आयोजित कृषि प्रदर्शनीचे उद्घाटन देखील उईके यांच्या हस्ते झाले.

जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची उत्कृष्ट अंमलबजावणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात योजनेचे 96 टक्के काम झाले आहे. त्यासाठी उईके यांनी प्रशासनाचे कौतूक केले. काही शेतकरी काही कारणास्तव राहून गेले आहे. त्यात ई-केवायसी नसेल किंवा आधार लिंक नसल्याने शेतकरी वंचित राहिले असल्याची शक्यता आहे. अशा सुटलेल्या 4 टक्के शेतकऱ्यांना योजनेचा लाभ कसा देता येईल, यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावे, असे उईके म्हणाले.

यावेळी जिल्हाधिकारी डॅा.आशिया यांनी देखील मनोगत व्यक्त केले. जिल्ह्यात फळबागांचे क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. 5 हजार हेक्टरवर लागवड केली जात आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून लाभ देण्याचा प्रयत्न केला जात आहे. पांदन रस्ते मोकळे करण्याची कारवाई केली जात आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले. कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ मयूर ढोले यांनी देखील मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संतोष डाबरे यांनी केले. यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल सुभाष शर्मा यांचा मंत्री उईके यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी हनुमंत देशमुख, मारोती अवसरे, किरण दाभाडे, हिम्मत आडे, महादेव वाघाडे, अर्चना रोकडे, साधना सारड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button