समाजात प्रेम, शांतता व सद्भावना निर्माण करण्याचे ब्रह्मकुमारींचे कार्य प्रशंसनीय : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

0

संस्कृती, प्रेम, शांती व सद्भावना राज्य अभियानाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

B1न्यूज मराठी नेटवर्क

मुंबई : एकीकडे मनुष्य विज्ञान – तंत्रज्ञान, उद्योग व व्यवसायात प्रगती करीत असताना दुसरीकडे तो वैयक्तिक व भावनिक स्तरावर अशांत होत आहे. अशावेळी ब्रह्मकुमारी संस्थेच्या भगिनींचे समाजात प्रेमभावना, शांतता व सद्भावना निर्माणाचे कार्य अतिशय प्रशंसनीय आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केले.

‘वैश्विक संस्कृती, प्रेम, शांतता व सद्भावना’ या ब्रह्मकुमारी संस्थेच्या कला व सांस्कृतिक विभागाच्या जागतिक अभियानाचे राज्यातील उद्घाटन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राजभवन मुंबई येथे संपन्न झाले, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

कला आणि कलाकारांच्या माध्यमातून तरुण पिढीला भारताच्या संस्कृती आणि सनातन मूल्यांशी जोडणे हा सदर अभियानाचा उद्देश आहे. कार्यक्रमाला चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते.

स्वतःसाठी जगणे चुकीचे नाही. परंतु केवळ स्वतःसाठी जगणे चुकीचे असल्याचे सांगताना ब्रह्मकुमारीसंस्था ध्यान व राजयोग यांच्या माध्यमातून प्रेम व शांतता या प्राचीन मूल्यांना नव्या पिढीपुढे आणण्याचे कार्य करीत असल्याबद्दल राज्यपालांनी आनंद व्यक्त केला.

आज मुक्त व्यापारामुळे जग लहान गाव झाले आहे. व्यापार वाढला आहे, त्यातून ग्राहकाचा फायदा होत आहे. परंतु अनेक क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा वाढली आहे. स्वतःला ओळखून इतरांसाठी कार्य करीत नाही तोवर मनुष्य जीवन अपूर्ण असल्याचे राज्यपालांनी नमूद केले.

आज जीवन खूप गतिमान झाले आहे. अशावेळी ध्यानाच्या माध्यमातून चित्त स्थिर करता येते व सकारात्मक विचार अंगीकारता येतात, असे त्यांनी सांगितले.

जीवनात सत्ता आणि पैसा या गोष्टी देखील महत्वाच्या आहे परंतु त्याचा उपयोग इतरांच्या सेवेसाठी झाला पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले. सर्वांनी एकत्रित काम करून देशाला बलशाली केले पाहिजे. देश बलशाली झाल्यानंतर प्रेम व सद्भावनेचा विचार जगाला दिल्यास त्याला लोक महत्व देतील असे राज्यपालांनी सांगितले.

कलाकारांच्या जीवनात प्रेम, शांती व सद्भावना महत्वाची : पूनम ढिल्लन

चित्रपट सृष्टी ही इतरांना आनंद देण्यासाठी व मनोरंजन करण्यासाठी निर्माण झाली असली तरी देखील प्रत्येक कलाकाराला स्वतःच्या समस्या असतात. त्यामुळे कलाकारांना आत्मिक शांतीसाठी प्रेम, शांतता व सद्भावनेची विशेष गरज असल्याचे अभिनेत्री पूनम ढिल्लन यांनी यावेळी सांगितले. जीवनात इतरांशी तुलना नको कारण प्रत्येक जण अद्वितीय असतो असे त्यांनी सांगितले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या