शहीद सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना माफी नाही – केंद्रिय राज्य मंत्री रामदास आठवले

सुरेश धस यांच्या दुटप्पी भूमिकेचा तीव्र निषेध
B1न्यूज मराठी नेटवर्क
मुंबई : आमदार सुरेश धस यांनी परभणी आंदोलनातील निर्दोष आंबेडकरी तरुण सोमनाथ सुर्यवंशी यांच्या पोलिसी मारहाणीत झालेल्या मृत्यूप्रकरणी दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल करू नका; मन मोठे करून पोलिसांना माफ करा अशी दुटप्पी भूमिका घेतली आहे. त्यांच्या या दुटप्पी भूमिकेचा तीव्र निषेध रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केला असून शहीद भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना माफी मिळणार नाही असा निर्धार आज ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
बिड मधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करा; त्यांना माफी नाही.आणि परभणीतील शहीद सोमनाथ सुर्यवंशी हत्ये प्रकरणी पोलिसांना माफ करा अशी दुटप्पी भूमिका घेतल्या बद्दल आमदार सुरेश धस यांचा आंबेडकरी जनतेने तीव्र निषेध केला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात बीड चे सरपंच संतोष देशमुख हत्येचा निषेध दलित आणि मराठा समाजाने एकत्र येऊन केला आहे.तसेच परभणीतील शहीद सोमनाथ सुर्यवंशी यांच्या पोलिसी अत्याचाराने झालेल्या हत्येचा सर्व राज्यात मराठा आणि दलित समाजाने एकत्र येऊन निषेध केला आहे. दलित मराठा दोन्ही समाज एकत्र येऊन न्याय मिळण्यासाठी लढा चालवीत आहेत.या लढाईतून महाराष्ट्रात दलित मराठा समाज एकत्र येत आहेत.त्यात फूट पडण्याचे पाप सुरेश धस यांनी करू नये असे ना.रामदास आठवले म्हणाले.
जशी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना माफी नाही तशीच सोमनाथ सुर्यवंशी यांच्या ही मारेकऱ्यांना माफी नाही हीच भूमिका सुरेश धस यांनी घ्यायला पाहिजे होती मात्र त्यांनी विपरीत भूमिका घेऊन भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना माफ करण्याची दुटप्पी भूमिका घेतल्या बद्दल रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आमदार सुरेश धस यांच्या दुटप्पीपणाचा रिपब्लीकन पक्षातर्फे तीव्र निषेध करीत असल्याचे रिपब्लीकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आज जाहीर केली.