बार्शीचे सचिन वायकुळे करणार आंतरराष्ट्रीय तृतीयपंथीय परिषदेत मार्गदर्शन

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : तृतीयपंथीयांच्या हक्क आणि सामाजिक बदलांसाठी कार्यरत असलेले बार्शीतील सचिन वायकुळे यांना आंतरराष्ट्रीय तृतीयपंथीय परिषदेस मार्गदर्शनासाठी निमंत्रण मिळाले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर येथे ३० व ३१ जानेवारी २०२५ रोजी होणाऱ्या या परिषदेत ‘तृतीयपंथीय व सामाजिक बदल’ या विषयावर वायकुळे आपले विचार मांडणार आहेत.
तृतीयपंथीयांच्या जगण्यातील आव्हाने, जागतिक स्तरावरील प्रगती, आरोग्य, संस्कृतीतील स्वीकृती व समानता यांसारख्या मुद्द्यांवर ही परिषद केंद्रित असेल. दोन दिवस चालणाऱ्या या आंतरराष्ट्रीय परिषदेतील प्रमुख चर्चेच्या विषयांमध्ये तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण, मानसिक व शारीरिक आरोग्य, तसेच रोजगारनिर्मिती यांचा समावेश आहे.
या परिषदेचे आयोजन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. परिषदेचे अध्यक्ष डॉ. गौतम कांबळे, सचिव डॉ. प्रभाकर कोळेकर, समन्वयक डॉ. ए. एल. भास्के, टी. एल. तांबोळी आणि डॉ. तेजस्विनी कांबळे यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत.
सचिन वायकुळे यांच्या सहभागामुळे बार्शीच्या तृतीयपंथीय चळवळीला एक नवी ओळख मिळणार असून, त्यांच्या विचारांनी जागतिक स्तरावर प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.