तब्बल 26 वर्षानंतर पुन्हा वाजली घंटा, माजी विद्यार्थ्यांची पुन्हा भरली शाळा; वर्गमित्रांच्या सहवासाने, कित्येक आठवणींना उजाळा !
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : दीपावली सुट्टीचे औचित्य साधून बार्शी टेक्निकल हायस्कूलच्या दहावी १९९७-९८ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा टेक्निकल हायस्कूलमध्ये संपन्न झाला. २६ वर्षानंतर सर्व मित्रमैत्रिणीं एकत्र जमले व पुन्हा शाळा भरली. घंटा वाजली, सर्वांनी गेटमधून शाळेत प्रवेश केला, गुरुजनांनी सर्वांसोबत राष्ट्रगीत गायले. हायस्कूलच्या सभाहाॅलमध्ये प्रतिमापूजन झाले. शिक्षकांचा माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते सत्कार झाला. आलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी स्वतःचा परिचय दिला.
सर्वांच्या एकत्र येण्यानं कित्येक आठवणी, प्रसंग आणि किस्से डोळ्यासमोर तरळल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टकले सर व व्यासपीठावर तत्कालीन शिक्षक भोसले सर, चव्हाण सर, नांदवटे सर, कदम सर, देशमुख सर, रमेश पाटील सर व रजपूत मॅडम, पाटील मॅडम, घोलप मॅडम उपस्थित होते.
त्यानंतर सर्वच गुरूवर्यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून सचिन जाधवर सध्या सहा.पोलीस आयुक्त,मुंबई व सारीका जाधवर सध्या पत्रकार, शिक्षिका या दोघांनी आपल्या मनोगतातून शालेय आठवणींना उजाळा दिला. आपला मित्र अशोक पालके देशसेवेसाठी भारतीय सीमेवर मेजर म्हणून कार्यरत आहे, त्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला. दुसरा मित्र रामभाऊ जगदाळे उद्योजक, पुणे त्यांचा ही सत्कार करण्यात आला.
सामाजिक उत्तरदायित्व म्हणून शाळेला दोन सायकल भेट देण्यात आल्या. दिवंगत शिक्षक व विद्यार्थ्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. तत्कालीन मुख्याध्यापक राजगुरू सर यांनी “ईतनी शक्ती हमे देना दाता” हे गीत गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश शिंदे तर आभार रामेश्वर भालेराव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वच विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.