वंचित बहुजन आघाडी देणार आरक्षणाला सुरक्षा !
B1न्यूज मराठी नेटवर्क
पुणे : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते मंगळवारी(दि.6 ) पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. यामध्ये सामाजिक, राजकीय, कृषी, युवक, पारलिंगी, महिला इ.संदर्भातील मुद्दे नमूद करण्यात आले आहेत. वंचित बहुजन आघाडीने एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षणाला सुरक्षा देणार असल्याचेही यामध्ये आश्वासन दिले आहे.
ओबीसी आरक्षणाचे ताट आणि मराठा आरक्षणाचे ताट वेगळे ठेऊन ओबीसी आरक्षणात कोणाला वाटेकरी होऊ देणार नाही, अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसींना पदोन्नती मध्ये आरक्षण देण्यासाठी धोरणात्मक कायदेशीर निर्णय घेऊ, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार अनुसूचित जातींच्या आरक्षणात आलेले क्रिमीलेयर आणि वर्गीकरण रद्द करू, खाजगी क्षेत्रात अनुसूचित जाती,जमाती आणि ओबीसींना आरक्षण लागू करू असे वंचित बहुजन आघाडीने जाहीरनाम्यात म्हटले आहे.
आरक्षण हा विधानसभा निवडणुकांमधील महत्वाचा आणि ज्वलंत विषय आहे. आपले आरक्षण संपणार अशी भीती आरक्षणवादी समुहामध्ये पसरली आहे. सरकारच्या आरक्षण संदर्भातील धोरणांवर हे आरक्षणवादी समूह नाराज आहेत, तर दुसरीकडे विरोधी पक्ष सुद्धा यावर काहीच भूमिका घेत नसल्याने वंचित बहुजन आघाडीचा हा जाहीरनामा या समूहांना दिलासा देणारा आहे, अशी चर्चा लोकांमध्ये सुरू आहे.