राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विदेशी मद्यासह ७६ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
B1न्यूज मराठी नेटवर्क
पुणे, दि.१ : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्ववभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे विभागीय भरारी पथकाने मुळशी तालुक्यात आदरवाडी गावाच्या हद्दीत, हॉटेल शैलेश समोरील पौड- माणगाव रस्त्यावर केलेल्या कारवाईत गोवा राज्य निर्मित विदेशी मद्यासह एकूण ७६ लाख ५५ हजार ५०० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गोवा राज्य निर्मीत व फक्त गोवा राज्यातच विक्रीकरीता परवानगी असलेल्या पोलंड प्राईड प्रिमियम कलेक्शन रिझर्व्ह व्हिस्की या ब्रॅण्डच्या विदेशी मद्याच्या १८० मिली क्षमतेच्या ३३ हजार ६०० सीलबंद बाटल्या (७०० बॉक्स ) वाहनात मिळून आल्या. मद्याची वाहतूक करण्याकरीता वापरलेला टाटा मोटर्स कंपनीचा तपकिरी रंगाचा सहाचाकी टेम्पो वाहन क्र. एमएच-०३- डीव्ही ३७१६ व मोबाईल फोन असा अंदाजे ७६ लाख ५५ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या गुन्ह्यामध्ये वाहन चालक जुल्फेकार ऊर्फ जुल्फेकार ताजअली चौधरी (वय ५० वर्षे) रा. हाऊस नं. २०४, मोहल्ला नाली पाडा, मसूरी डासना आर. एस. जि. गाजियाबाद, उत्तरप्रदेश यास जागीच अटक करून त्याचेविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ च्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे विभागीय उपआयुक्त सागर धोमकर यांच्या निर्देशानुसार दुय्यम निरीक्षक विराज माने, अतुल पाटील, धीरज सस्ते, जवान प्रताप कदम, सतिश पोंधे, अनिल थोरात, शशीकांत भाट, राहुल ताराळकर, महिला जवान उषा वारे आदींनी केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक विराज माने करत आहेत, अशी माहिती पुणे विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक नरेंद्र थोरात यांनी दिली आहे.