‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमांतर्गत आयोजित महारोजगार मेळाव्यात ६३९ उमेदवारांची रोजगारासाठी निवड
B1न्यूज मराठी नेटवर्क
पुणे : ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमांतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने जेजुरी (ता. पुरंदर) येथे आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्यात नोंदणी केलेल्या १ हजार २९ उमेदवारांपैकी ६३९ उमेदवारांची रोजगारासाठी जागीच निवड करण्यात आली. विशेष म्हणजे महारोजगार मेळाव्यात निवड झालेल्या ३ उमेदवारांचे नियुक्तीपत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
या मेळाव्यासाठी महास्वयम् पोर्टलवर रोजगारासाठी बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली केली होती. तसेच उद्योजकांनी विविध पात्रतेच्या रिक्त पदांची मागणी नोंदविली होती. या महारोजगार मेळावा कार्यक्रमामध्ये ५ हजार ३९५ रिक्त पदांच्या भरतीसाठी ३२ उद्योजकांनी सहभाग नोंदविला. या मेळाव्यामध्ये १ हजार २९ उमेदवारांची नोंदणी झाली. त्यानुसार सर्व उमेदवारांच्या मुलाखती घेऊन ६३९ उमेदवारांची निवड करण्यात आली.