पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या जीवनगौरव पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन, 30 जूनपर्यंत करता येणार नामांकन व शिफारस

B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्यावतीने देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या जीवनगौरव पुरस्कारासाठी दि. 30 जून 2023 पर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन कुलसचिव योगिनी घारे यांनी केले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्यावतीने सन 2015 पासून दरवर्षी 1 ऑगस्ट रोजी विद्यापीठाच्या वर्धापन दिनी जीवनगौरव पुरस्कार दिला जातो. यासाठी प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. राजनीश कामत, प्र-कुलगुरु प्रा. डॉ. गौतम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित घटकाकडून प्रस्ताव मागण्यात येत आहेत. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर कला, संस्कृती, साहित्य, शास्त्र, क्रीडा, शिक्षण आणि संशोधन, सामाजिक, राजकीय, कृषी, उद्योग व व्यापार, पत्रकारिता आदी क्षेत्रामध्ये जीवनभर सामाजिक बांधिलकी मानून विशेष उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महनीय व्यक्तीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सोलापूर जन्मभूमी व कर्मभूमी असणाऱ्या पात्र व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो.
या पुरस्कारासाठी वरील क्षेत्रातील मान्यवराचे/ व्यक्तीचे नामनिर्देशन आणि शिफारस प्रस्ताव विद्यापीठाकडे सादर करण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत 30 जून 2023 आहे. शासनमान्य संस्थांचे प्रमुख, सामाजिक, शैक्षणिक, संशोधन संस्थेचे अध्यक्ष, सोलापूर विद्यापीठाचे अधिसभा व विद्वत सभेचे सदस्य योग्य व्यक्तीचे नामांकन आणि शिफारस करू शकतात. नामांकन करणारी व्यक्ती फक्त एकाच योग्य व्यक्तीची शिफारस करू शकणार आहे. तसेच पात्र व्यक्तीस स्वत:देखील अर्ज करता येईल. विद्यापीठाच्या मानाच्या या जीवनगौरव पुरस्काराचे स्वरुप रोख रक्कम 51 हजार रुपये, सन्मानचिन्ह, गौरवचिन्ह असे आहे. पुरस्कारासंदर्भात अधिक माहिती विद्यापीठाच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.
या पुरस्कारांसाठीही मागविले प्रस्ताव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वर्धापन दिनी देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट शैक्षणिक संस्था पुरस्कार, उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार, उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार, उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार आणि उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कारासाठी देखील संबंधित घटकांकडून प्रस्ताव मागवण्यात आल्याची माहिती कुलसचिव योगिनी घारे यांनी दिली. विद्यापीठाच्या कुलसचिव यांच्या नावे दि. 30 जून 2023 पर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.