प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्यमान कार्ड काढून घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन जिल्ह्यातील 11 लाखांपैकी 3 लाख लाभार्थ्यांकडे आयुष्यमान कार्ड

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

अहमदनगर : आयुष्मान प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे जिल्ह्यात 11 लाख 955 लाभार्थी आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी ह्या लाभार्थ्याकडे आयुष्मान कार्ड असणे आवश्यक आहे. जिल्ह्यात आज अखेर 3 लाख 18 हजार 500 लाभार्थ्यांनी आयुष्मान कार्ड काढलेले आहेत‌. उर्वरित लाभार्थ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र, खासगी आपले सरकार सेवा केंद्र तसेच अंगीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्रांकडून आयुष्यमान कार्ड काढून घ्यावे. असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदिप सांगळे यांनी केले आहे.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी आरोग्य विमा योजना आहे. ह्या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना योजनेच्या अंगीकृत रुग्णालयात 5 लाख रुपयापर्यंतचे उपचार मोफत होतात. ह्या योजनेंतर्गत अहमदनगर जिल्ह्यामध्ये 44 अंगीकृत रुग्णालये आहेत. ह्या योजनेंतर्गत 1209 प्रकारच्या आजारावर मोफत उपचार केले जातात. ह्या आजारामध्ये हृदय विकार, मेंदू विकार, किडनी विकार, अपघात, कर्करोग इत्यादी प्रकारच्या गंभीर आजारावर उपचार व शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. या योजनेचा लाभ हा आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना दिला जातो. योजनेच्या लाभार्थ्यांची यादी ही www. apkedwarayushman. pmjay. gov.in ह्या संकेतस्थळावर तसेच ग्रामसेवक व आरोग्य विभागाकडे उपलब्ध आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामपंचायत मधील आपले सरकार सेवा केंद्र येथील केंद्र चालक, खासगी आपले सरकार सेवा केंद्र (common service centre) येथील केंद्र चालक तसेच अंगीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्रांना याबाबत सूचना दिलेल्या आहेत. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी आयुष्मान कार्ड काढून घेण्यासाठी रेशन कार्ड आणि आधार कार्ड घेऊन जाणे आवश्यक आहे.

महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे‌. या मोहीमेचे संनियंत्रण जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. संजय घोगरे हे करत आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या