लोकेश चंद्र यांनी स्वीकारली महावितरणच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रे

B1न्यूज मराठी नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून श्री. लोकेश चंद्र (भाप्रसे) यांनी शुक्रवारी (दि. २) पदाची सूत्रे स्वीकारली आहे. याआधी ते मुंबई ‘बेस्ट’ उपक्रमाचे महाव्यवस्थापक पदी कार्यरत होते.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र हे १९९३ च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी आहेत. त्यांनी आयआयटी (दिल्ली) मधून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी आणि एमटेक (स्ट्रक्चर्स) पदवी प्राप्त केली आहे.
चंद्र यांनी यापूर्वी सिडकोचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून काम केले आहे. तसेच नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि नागपूर सुधार प्रन्यासचे अध्यक्ष म्हणून चंद्र कार्यरत होते. सन २००८ ते २०१५ या कालावधीत ते केंद्र शासनाच्या सेवेत प्रतिनियुक्तीवर होते. या काळात चंद्र यांनी पोलाद मंत्रालयाचे सहसचिव व ऊर्जा मंत्रालयाचे संचालक म्हणून काम पाहिले आहे.