वारकरी, भाविकांना उष्माघाताचा त्रास होऊ नये यासाठी दक्षता घ्यावी : जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे

B1न्यूज मराठी नेटवर्क
पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आगमन 23 जून तर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आगमन 24 जून 2023 रोजी असून, अन्य संतांच्या पालखी सोहळ्यासोबत आषाढी वारीसाठी मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात. दरवर्षीपेक्षा पालखी सोहळ्यांचे प्रस्थान अगोदर होत असल्याने उन्हाळ्याचा त्रास वारकरी भाविकांना होऊ नये यासाठी आवश्यकती दक्षता घेवून पालखी तळावर व मार्गावर मुबलक पाणी पुरवठा व पुरेसा औषध साठा उपलब्ध ठेवावा अशा सूचना प्र. जिल्हाधिकारी तुषार ठोबरे यांनी दिल्या.
आषाढीवारी पुर्वनियोजनाबाबत शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस प्रांताधिकारी गजानन गुरव, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी अरविंद माळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, पोलीस निरिक्षक मिलींद पाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसन्न भातलवंडे, तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्र. जिल्हाधिकारी ठोंबरे म्हणाले, वारकरी भाविकांना पालखी तळांवर, मार्गावर शुध्द व मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी निश्चित करण्यात आलेल्या पाण्याच्या स्त्रोतांची व पाण्याची वेळोवेळी तपासणी करण्यात यावी.तसेच भाविकांना पाणी मुबलक प्रमाणात मिळेल यादृष्टीने आवश्यक ते नियोजन करावे. आरोग्य विभागाने ओआरएस बरोबर पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवावा. गर्दीच्या ठिकाणी तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी दुचाकीवरुन सेवा देण्यासाठी आरोग्य दूत सुसज्ज ठेवावेत. पालखी तळावर देण्यात आलेल्या सुविधांमध्ये पाणी व्यवस्था, आरोग्य सुविधा, आपत्कालिन कक्ष, शौचालय, अग्नीशमन व्यवस्था आदीबाबतचे माहिती फलक लावावेत.
नगरपालिकेने यात्रा कालावधीत स्थानिक लोकसंख्या तसेच येणाऱ्या भाविकांची संख्या विचारात घेवून मुबलक प्रमाणात पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी. तसेच शहरातील नगरपालिकेच्या बोअरवेलसह खाजगी बोअरवेलव्दारे पाणीपुरवठा करावा तसेच नदी पात्र, 65 एकर, मंदीर परिसर येथील वेळोवळी स्वच्छता करावी अशा सूचनाही प्र. जिल्हाधिकारी ठोबरे यांनी दिल्या.त्याचबरोबर हरीत वारी आणि निर्मल वारीसाठी सर्वांनी सहभाग घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी पालखी तळांवर व मार्गावर वारकरी भाविकांसाठी करण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची माहिती दिली. तर 65 एकर, नदी पात्र तसेच शहरात नगरपालिकेमार्फत करण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची माहिती यावेळी मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी दिली.