ज्योतिबांचा सामाजिक सुधारणेचा वारसा प्रत्येकाने जपावा : संदीप तामगाडगे
क्रांतिसूर्य महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन
B1न्यूज मराठी नेटवर्क
नागपूर : दलित, शोषित, पीडीत समाजासाठी अहोरात्र झटणारे भारतीय समाजक्रांतीचे जनक, थोर समाज सुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा सामाजिक सुधारणेचा वारसा प्रत्येकांनी जपावा, असे प्रतिपादन नागालँडचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संदीप तामगाडगे यांनी आज येथे केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑडीटोरियम, दीक्षाभूमी येथे क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची जयंती अभिनव पद्धतीने साजरी करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, महाज्योतीचे संचालक राजेश खवले, जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर, प्रादेशिक समाजकल्याण उपायुक्त डॉ.सिद्धार्थ गायकवाड, सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर, कृष्णा इंगळे, भूषण दवडे, भूपेश थुलकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. सामाजिक समतेमुळे पुर्वोत्तर भारतातील नागालँडसारख्या राज्यात प्रथमच दोन महिला विधानसभा सदस्य निवडून आल्या आहेत. महात्मा फुले यांनी न्याय, समता, स्वातंत्र्य व बंधुता या चार तत्वांवर आधारित सत्यशोधक समाजाची स्थापना करून समाजातील अनेक कुप्रथा बंद केल्या. पुरुषांबरोबरच महिलांनाही शिक्षणाच्या प्रवाहात त्यांनी आणले. महिलांची गुलामगिरीच्या बेड्यातून सुटका केली. ज्योतिबांच्या प्रागतिक विचारांमुळेच महिलांना शैक्षणिक स्वातंत्र्य मिळाले, असेही त्यांनी सांगितले.
सामाजिक न्याय विभागातर्फे घरकुलांची व्यवस्था, शेळीमेंढी पालन अशा अनेक समाजोपयोगी योजना सामाजिक पर्वांतर्गत राबविण्यात येत आहेत. यासोबतच महापुरुषांचे जयंती व पुण्यतिथी कार्यक्रमही करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून ही जयंती अभिनव पद्धतीने साजरी करण्यात येत असल्याचे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सांगितले.
ज्योतिबांनी जगाला बदलविण्याचे सामर्थ्य दिले आहे. त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या जागर करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. साहित्य निर्मितीतून त्यांनी समाजाचा शैक्षणिक विकास घडविला. ज्योतिबांनी सर्वांसाठी ज्ञानाचे द्वार मोकळे केले व स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. यामुळेच देशाला दोन महिला राष्ट्रपती व एक प्रधानमंत्री लाभले असल्याचे त्यांनी सांगितले. सामाजिक न्याय विभागाद्वारे फुलेवाडा शैक्षणिक योजना तयार करून सामजिक समता निर्माण करण्याचे काम हाती घेतले असून ज्योतिबांच्या प्रती हेच खरे अभिवादन ठरेल. त्यांच्या विचाराचा जागर करून समतामुलक समाजाची स्थापना करता येईल. विषमता दूर करून भृणहत्येसारखे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणे व समाज विघटन थांबवून समता प्रस्थापित करणे आजच्या पिढीला सांगणे गरजेचे आहे. त्यासाठीच महापुरुषांच्या विचारांचा जागर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. महाज्योतीचे संचालक राजेश खेवले यांनी महाज्योतीचे कार्य व ज्योतिबांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. डॉ. सिध्दार्थ गायकवाड यांनी कार्यक्रमाची रुपरेषा विशद केली.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. स्वररंग म्युजिकल ग्रृपद्वारे पोवाडा व ‘सावित्रीच्या लेकी आम्ही ! ज्योतिबांचे विचार फुलवू!’ या सुमधूर गीतगायनाने आणि महाराष्ट्र गीत व संविधान वाचनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणूका देशकर यांनी केले तर उपस्थिताचे आभार सुकेशिनी तेलगोटे यांनी मानले.