मराठी भाषा विद्यापीठाचे स्वरुप, अभ्यासक्रमांची रचना याबाबत समिती लवकरच गठित करणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

अमरावती : रिद्धपुर ही संत गोविंदप्रभू, चक्रधर स्वामींच्या वास्तव्याने पुनित झालेली अध्यात्मभूमी आहे. लीळाचरित्रासह अनेक महत्वाचे मराठी ग्रंथ येथे लिहिले गेले. या भूमीचे महत्त्व लक्षात घेऊन रिध्दपूर येथे मराठी भाषा विद्यापीठाचे स्वरुप निश्चित करण्यासाठी समिती 15 दिवसात स्थापन करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रिध्दपूर येथे केले.

रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठाबाबत फडणवीस यांनी नियोजनभवनात बैठकीद्वारे आढावा घेतला व त्यानंतर श्रीक्षेत्र रिद्धपूर येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी श्री गोविंदप्रभू राजमठ, श्री यक्षदेव बाबा मठ, सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी मराठी भाषा व तत्वज्ञान अध्ययन केंद्राला भेट दिली. खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार प्रताप अडसड, आमदार देवेंद्र भुयार, आमदार परिणय फुके, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे कुलगुरु प्रा. रणजीत कुमार शुक्ल, विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय, प्रभारी जिल्हाधिकारी अविष्यांत पंडा, निवेदिता चौधरी यांच्यासह गोपीराज बाबा शास्त्री, मोहनदास महाराज, यक्षदेव बाबा बीडकर, बाभुळकर बाबा शास्त्री, वैरागी बाबा, कारंजेकर बाबा, वाईनदेशकर बाबा शास्री आदी मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, रिद्धपूर ही महानुभाव पंथाची काशी आहे, तशीच ती मराठी भाषेचीही काशी आहे. विद्यापीठाचे काम पुढे नेण्यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या जागेत तत्काळ कार्यवाही सुरू करण्यात येईल. विद्यापीठाच्या दृष्टीने आवश्यक सर्व बाबींसाठी निधी वेळोवेळी उपलब्ध करून दिला जाईल.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी श्री गोविंद प्रभू राजमठ येथे भेट देऊन दर्शन घेतले. मठातर्फे मोहनराज बाबा कारंजेकर यांनी त्यांचे स्वागत केले त्याचप्रमाणे, श्री यक्षदेव महाराज मठ येथेही भेट देऊन दर्शन घेतले. मठातर्फे उपमुख्यमंत्र्यांचा गौरव करण्यात आला. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातर्फे रिद्धपुर येथे सुरू केलेल्या सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी मराठी भाषा व तत्वज्ञान अध्ययन केंद्रालाही श्री. फडणवीस यांनी भेट दिली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या