महात्मा फुले जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन
B1न्यूज मराठी नेटवर्क
पुणे : इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) व सहायक आयुक्त, समाज कल्याण, पुणे यांच्या संयुक्त विद्यामाने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनातील प्रसंगावर चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुणे जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांमध्ये प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर सदर स्पर्धा घेतल्या जाणार आहेत.
व्यावसायिक, बिगर व्यावसायिक व कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी व महाविद्यालयांनी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मामासाहेब मोहोळ महाविद्यालयाशी ४८ / १ए, रामबाग कॉलनी, पौड रोड, कोथरूड, पुणे-०४ या पत्त्यावर संपर्क साधावा. स्पर्धा १२ ते २५ एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील आश्रमशाळा विद्यार्थी आणि महाविद्यालयातील विध्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त संगिता डावखर यांनी केले आहे.
महात्मा फुले जयंतीनिमित्त रॅलीच आयोजन
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त ११ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता फुलेवाडा, गंजपेठ पुणे येथे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या उपस्थितीत महात्मा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात येणार असून फुलेवाडा ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकापर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनातील प्रसंगावर थ्री-डी रांगोळीचे कलादालन येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांवर डॉ. श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान व शाहीर हेमंत मावळे यांचा पोवाड्यांचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.