आनंदाचा शिधा पोहचला सोलापूरात, दुकानदारांना वितरण चालू; आठ दिवसात घरात पोहचणार

B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : दिवाळीच्या धरतीवर गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शिंदे-फडणवीस सरकारने जाहीर केलेला आनंदाचा शिधा गोदामात पोहचला आहे.सोमवार आजपासून या किटचे वितरण रेशन दुकानदारांना केले जाणार आहे. आठ दिवसात सर्व रेशन दुकानांमध्ये हा शिधा पोहचणार असून १४ एप्रिल पूर्वी या आनंदाच्या शिधाचे वाटप होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अखेर शासनाचा आनंदाचा शिधा शासकीय गोदामा मध्ये दाखल झाला आहे. दिवाळीच्या धरतीवर रेशन दुकानदार माध्यमातून कार्डधारकांना चणाडाळ, शंभर रुपयात रवा साखर आणि एक किलो तेल याप्रमाणे चार वस्तू दिल्या जाणार आहेत.
गुढीपाडव्याला येणारा शिधा शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विघ्न निर्माण झाले होते. संप संपल्यानंतर शासनाने गतिमान हालचाली करून शिधा राज्यातील सर्व शासकीय गोदामांमध्ये दाखल झाला आहे. सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व गोदामा मध्ये हा आनंदाचा शिधा पोहोचला आहे. जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने आणि अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्या वतीने वाटपाचे नियोजन चालू झाले आहे. आज सोमवारपासून सोलापूर शहरातील सर्व तीनशे ते साडेतीनशे दुकानांमध्ये शिधा पोहोचण्यासाठी किमान आठ दिवसाचा कालावधी लागणार आहे आठ दिवसानंतर म्हणजेच १४ एप्रिल पूर्वी आनंदाचा शिधा लाभधारकांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दिवाळीनंतर पाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला शासनाने शिधाचे वाटप केले त्याच धर्तीवर आता रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर देखील हा आनंदाचा शिधा देण्याचे जाहीर करावे अशी चर्चा शहरात चालू आहे.
दुकानदार वाटपासाठी सज्ज
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी व्हावी यासाठी शासनाने जाहीर केलेला आनंदाचा शिधा वाटपासाठी रेशन दुकानदार सज्ज झाले आहेत पुढील सोमवारपासून आनंदाचा शिधा वाटप सुरू होईल. सुट्टीच्य दिवशी रात्रंदिवस दुकानदार दुकाने उघडे ठेवून हे वाटप क करण्याचे नियोजन संघटनेने केले असल्याचे नितीन पेंटर (जिल्हा समन्वयक रेशन दुकानदार संघटना) यांनी सांगितले.
सोलापूर शहर लाभार्थी आणि संख्या
अंत्योदय योजना (६१४५ कार्ड २४६९० लोकसंख्या)
अन्नसुरक्षा योजना (१०९८०४ कार्ड ४९४७१३ लोकसंख्या)
ग्रामीण भागातील लाभार्थी आणि संख्या
अंत्योदय योजना (५४३४७ कार्ड २५५७५६ लोकसंख्या)
अन्नसुरक्षा (३५१२२१ कार्ड १७०११५४ लोकसंख्या)
सोलापूर शहर जिल्हा एकूण लाभार्थी
अन्नसुरक्षा (४६१०२५ कार्ड २१९५८६७ लोकसंख्या) –
अंत्योदय- (६०४९२ कार्ड २८०४४६ लोकसंख्या