धाराशिव-बार्शी हद्दीवर तांत्रिक वस्त्रनिर्मित्ती प्रकल्प, विधानसभेत घोषणा
B1न्यूज मराठी नेटवर्क
धाराशिव – जिल्ह्यातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या टेक्निकल टेक्सटाईलच्या मागणीला हिरवा कंदील मिळाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी आणि धाराशिव जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या कौडगाव येथील एमआयडीसीसाठी तांत्रिक वस्त्रनिर्मिती वस्त्रनिर्मिती प्रकल्प उभारण्याची मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून अनेक वर्षांपासून केली जात होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान पुन्हा हा विषय सभागृहात आला. त्यावर, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिलंय.
सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महाजनादेश यात्रेदरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धाराशिव येथे तांत्रिक वस्त्रोनिर्मिती प्रकल्पाची घोषणा केली होती. अंदाजे १० हजार रोजगार निर्मितीचा हा प्रकल्प धाराशिव येथे उभारला जाणार असल्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले. भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी प्रश्नाला उत्तर देताना सामंत यांनी ही माहिती दिली.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर सहा महिन्यांपूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौडगाव एमआयडीसीतील तांत्रिक वस्त्रनिर्मिती प्रकल्पाला मान्यता देण्याची विनंती केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली, प्रकल्पाला आवश्यक असलेली जागा आणि इतर पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. तांत्रिक वस्त्रांची, बांधकाम, क्रीडा व अँटोमोबाईल क्षेत्रात मोठी मागणी आहे. त्यामुळे राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग मिशनची स्थापनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी या प्रकल्पावर शिक्कामोर्तब केले. सभागृहात आमदार पाटील यांच्या प्रश्नाला उत्तर देताना, सहा महिन्यांपूर्वीच आपण केंद्राकडे प्रस्ताव पाठवला असल्याचे सामंत यांनी सांगितले.
अंदाजे १० हजार रोजगार निर्मित्ती राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत धाराशिवचे दरडोई उत्पन्न अत्यंत कमी आहे. केवळ शेती आणि शेती आधारीत व्यवसाय हा एकमेव उत्पन्नाचा स्त्रोत आहे. जिल्ह्यात एकही मोठा औद्योगिक प्रकल्प नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते. उद्योगमंत्र्यांनी जाहीर केलेल्या या तांत्रिक वस्त्रोद्योग प्रकल्पामुळे जिल्ह्यात १० हजार जणांसाठी रोजगार निर्मिती होणार आहे. अर्थसंकल्पात जिल्ह्याच्या पदरात भरभरून दिल्यानंतर उद्योगमंत्र्यांनी आणखी एक मोठी भेट धाराशिवकरांसाठी जाहीर केली आहे.