बालकामगार, बालविवाह थांबविण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करा : राहुल कर्डिले

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

वर्धा : बालगृहातील मुलांची नियमितपणे आरोग्य तपासणी करण्यात यावी तसेच बाल विवाह, बालकामगार व बालकांमधील व्यसनाधिनता थांबविण्यासाठी विविध विभागांनी एकत्रितपणे प्रयत्न करा, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय कृती दल, मिशन वात्सल्य, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व बाल कल्याण समितीची संयुक्त बैठक घेण्यात आली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव विवेक देशमुख, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रशांत विधाते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मेसरे, कौशल्य विकासच्या सहायक आयुक्त निता औघड, माविमच्या जिल्हा समन्वयक संगिता भोंगाडे, जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस. एस. कुलकर्णी, सरकारी कामगार अधिकारी भगत उपस्थित होते. कोविडमुळे एक किंवा दोनही पालक गमावलेल्या बालकांना देण्यात आलेल्या लाभाची माहिती बैठकीत देण्यात आली. मिशन वात्सल्य अंतर्गत अशा बालकांना व विधवा महिलांना शासनाच्या विविध विभागांच्या योजनांचा लाभ द्यावा. कोविडमध्ये विधवा झालेल्या महिलांना कौशल्य विकास व माविम अंतर्गत प्रशिक्षण देण्यात यावे व अशा महिलांना बचतगटांशी जोडून घ्यावे, अशा सुचना जिल्हाधिकारी यांनी केल्या.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने प्राप्त झालेल्या बाल न्याय निधीचा उर्वरित बालकांना तात्काळ लाभ द्यावा. मिशन वात्सल्य समितीच्या तालुकास्तरीय बैठका नियमितपणे घ्याव्यात व बैठकीस सर्व सदस्यांनी उपस्थित राहावे, असे निर्देश त्यांनी दिले. बालगृहातील मुलांची नियमित आरोग्य तपासणी करावी. बाल विवाह व बालकामगार, बालकांमधील व्यसनाधिनता व अक्षय तृतीया या दिवशी होणारे बालविवाह रोखण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बालकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने शाळा, महाविद्यालय, लेआऊट मधील परिसर, निर्जन स्थळे याठिकाणी दामिनी पथकाने आपली गस्त वाढवावी. बाल हक्कांच्या संरक्षणासाठी अधिक सक्षमपणे प्रयत्न होणे आवश्यक आहे. आपल्या कार्यक्षेत्रात बाल विवाह होऊ नये या करिता सातत्याने प्रयत्न करावेत, असे निर्देश रोहन घुगे यांनी दिले. गाव बाल संरक्षण समितीची पुनर्स्थापना करून बालकांचे प्रश्न या समितीच्या मार्फत सोडविण्यात यावे, असे निर्देश बैठकीमध्ये देण्यात आले. बैठकीला वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रवीण धमाने, उपशिक्षणाधिकारी संजय मेहरे, सर्वशिक्षा अभियानाचे किशोर भैसारे, भरोसा सेलच्या पोलिस उपनिरीक्षक प्रीती आडे, चित्रा चाफले, जिल्हा परिविक्षा अधिकारी रमेश दडमल, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी माधुरी भोयर, बाल कल्याण समिती अध्यक्ष स्मिता बढीये, सदस्य डॉ. गीता धनाढ्य, ममता बालपांडे, बाल न्याय मंडळ सदस्य गजानन जंगमवार आदी उपस्थित होते.


About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या