‘चला जाणुया नदीला’ अभियानातील युवा जलप्रहरींचा गौरव सोहळा संपन्न

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

पुणे : आंतरराष्ट्रीय नद्यांसाठीच्या कृती दिवसाच्या औचित्याने राज्य शासन आणि जल बिरादरी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या ‘चला जाणुया नदीला’ अभियानातील युवा जलप्रहरींचा गौरव सोहळा फर्ग्युसन महाविद्यालय येथे संपन्न झाला. यावेळी जलबिरादरीचे संस्थापक डॉ.राजेंद्र सिंह दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. कार्यक्रमास नगरविकास विभागाचे उपायुक्त व्यंकटेश दुर्वास, उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे – देवकाते, शिक्षणतज्ज्ञ देवयानी गोविंदवार, युनिसेफच्या राज्य सल्लागार प्रियंका शेंडगे, फर्ग्युसन महाविद्यालयाच्या पर्यावरणशास्त्र विभाग प्रमुख डॉ.रुपाली गायकवाड, रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे संस्थापक प्रदीप वाल्हेकर, जल बिरादरीचे राष्ट्रीय युवा संयोजक गिरीश पाटील आदी उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे – देवकाते म्हणाल्या, पवनायात्रींनी या उपक्रमाच्या माध्यामातून नदीची सद्यस्थिती जीवंत स्वरुपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे प्रशासकीय कामात उर्जा मिळेल, असेही त्या म्हणाल्या. नगरविकास विभागाचे उपायुक्त श्री. दुर्वास म्हणाले, पवना नदी यात्रा उपक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले आहे. उर्वरित १० नद्यांच्या यात्रांसाठी जिल्हा प्रशासन सर्वोतोपरी सहकार्य करेल.डॉ. राजेंद्र सिंह म्हणाले, या अभियानात युवकांची भूमिका महत्वाची आहे. शासकीय स्तरावरुन काम सुरु आहे. परंतु युवकांनी स्वयंप्ररेणेने काम करून आपल्या नद्यांना पुन्हा अमृत वाहिनी बनवण्यासाठी प्रयत्न करावे. पवना नदी यात्रेसारखे प्रयोग युवा नदी प्रहारींची प्रशिक्षणशाळाच आहे, असेही ते म्हणाले. शिक्षणतज्ज्ञ श्रीमती गोविंदवार यांनी ‘आतली नदी वाहती ठेवण्यासाठी..’ या विषयावर संवाद साधला. यावेळी मनोज बोरगावकर लिखित नदीष्ट कादंबरीचे अभिवाचन ‘द कुलाबा टीम’च्या गटाने केले. या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील ११ नद्यांचा यामध्ये समावेश असून यामधील पवना नदीची यात्रा २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. या यात्रेत ३० पदयात्री पूर्णवेळ सहभागी होते, त्यांनी नदी, तिच्यावर अवलंबून असलेल्या परिसंस्था, नदीकाठची गावे व त्यांची जीवनशैली, व्यवसाय याविषयावर नृत्य, गायन, चित्र, काव्यवाचन, संवाद आदी माध्यमाद्वारे आपला अनुभव इतरांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी यात्रेत सहभागी झालेल्या पदयात्रींचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या