आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये आश्रमशाळांची महत्त्वाची भूमिका

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील होटगीच्या शासकीय आदिवासी आश्रमशाळेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

सोलापूर, (जि. मा. का.) : राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतात. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय आश्रमशाळा कार्यरत आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये या आश्रमशाळांची महत्त्वाची भूमिका असून आश्रमशाळांचे योगदानही उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशूसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे केले. शासकीय आदिवासी आश्रमशाळा होटगी येथे नवीन शालेय इमारतीचे उद्‌घाटन व आदर्श आश्रमशाळा बहुउद्देशीय सभागृह पायाभरणी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार रणजीतसिंह नाईक – निंबाळकर, आमदार सुभाष देशमुख, माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी मनिषा आव्हाळे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, प्रशासनात नोकरीची संधी मिळावी यासाठी आदिवासी विकास विभाग योजना व उपक्रम राबविते. आदर्श आश्रमशाळेच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आमूलाग्र बदल होणार असून आदिवासी विद्यार्थ्यांना भौतिक व शैक्षणिक सुविधांनी परिपूर्ण शिक्षण मिळणार आहे. विद्यार्थ्यांना आश्रमशाळेच्या माध्यमातून शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सहाय्य करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सुविधांचा लाभ घेऊन उच्च शिक्षित व्हावे आणि गावाचा विकास घडवून आणावा, असेही आवाहन त्यांनी यावेळी सांगितले.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील पर्यटन स्थळासाठी विशेष निधी द्यावा. तसेच वन क्षेत्रच्या जागेमध्ये बांबू लागवड करून स्थानिकांना रोजगार मिळवून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना अधिकच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधीची उपलब्धता व्हावी, अशी मागणी आमदार सुभाष देशमुख यांनी यावेळी केली. दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच मान्यवरांचा सत्कार आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.
नवीन शालेय इमारतीची माहिती
नवीन शालेय इमारतीचे एकूण क्षेत्र जवळपास 1900 चौ. मी. आहे. इमारतीत तळमजल्यावर दोन वर्गखोल्या, मुलांचे व मुलींचे प्रसाधनगृह, मुख्याध्यापक व शिक्षक कक्ष, भांडार कक्ष, कर्मचारी प्रसाधनगृह, तसेच पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर प्रत्येकी 5 वर्गखोल्या, मुलांचे व मुलींचे प्रसाधनगृह आणि ग्रंथालय यांचा समावेश आहे. तसेच, संरक्षक भिंत, वाहनतळ, अंतर्गत रस्ते व विद्युतीकरण या कामांचा समावेश आहे. यासाठी जवळपास सव्वा सहा कोटी रूपयांचा निधी आहे.

आदर्श आश्रमशाळा माहिती महाराष्ट्रात ४९९ पैकी ३० शासकीय आश्रमशाळा ह्या आदर्श आश्रमशाळा विस्तारित इमारत करण्याबाबत शासन स्तरावर निर्णय होऊन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सोलापूर अंतर्गत असलेल्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळा होटगी या आश्रमशाळेची निवड करण्यात आली. या शाळेत सद्यस्थितीत अनुसूचित जमातीचे २८० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आदर्श आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना निवास व भोजनाची उत्तम सोय करण्यात येते. मुला – मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहे आहेत. तसेच जी + २ नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. या इमारतीमध्ये डिजीटल क्लासरुम, सुसज्ज व अद्ययावत प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा, अभ्यासिका, ओपन जिम, क्रीडांगण तसेच बेडींग व्यवस्था करण्यात आलेली आहे. शासकीय आदिवासी आश्रमशाळेचे आदर्श शाळेत रूपांतर करणे या बाबींतर्गत अस्तित्वातील शालेय इमारत वाढवणे, नवीन बहुउद्देशीय सभागृह व संरक्षक भिंत या कामांचा समावेश आहे. यासाठी जवळपास पावणे चार कोटी रूपयांचे अंदाजपत्रक आहे. नवीन बहुउद्देशीय सभागृहाचे बांधकाम करण्यात येणार असून स्वच्छ व शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अंघोळीकरिता सौर उष्णजल संयंत्र आणि १२ किलो वॅट क्षमतेचे सौर विद्युत संच, मैदानावर १२ मीटर उंचीचे २ सौर हायमास्ट मंजूर असून बसविण्यात येणार आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या