जिल्ह्याच्या सर्वंकष विकासासाठी प्रशासन जास्तीत जास्त सकारात्मक : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर जिल्हा विकास आराखडा बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून प्रतिपादन

पालकमंत्री महोदयांच्या सूचनांनुसार विविध मान्यवरांच्या सूचनांसाठी व्यासपीठ उपलब्ध

सोलापूर, दि. 11 (जि. मा. का.) : सोलापूर जिल्ह्याच्या सर्वंकष विकासासाठी आजच्या बैठकीत प्राप्त सूचनांबाबत माननीय पालकमंत्री महोदय यांना अवगत करू. जिल्ह्याच्या सर्वंकष विकासासाठी प्रशासन जास्तीत जास्त सकारात्मक निर्णय घेईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे दिली. सोलापूर जिल्हा विकास आराखडा बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित या बैठकीस अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूरच्या कुलगुरू मृणालिनी फडणीस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी, पालकमंत्री संपर्क कक्षाच्या प्रमुख तथा उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, पोलीस उपाधीक्षक डॉ. दीपाली काळे, जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, तहसीलदार अंजली मरोड आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून, तसेच, प्राचार्य, उद्योजक व अन्य क्षेत्रातील मान्यवरांच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विचारमंथन होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केल्या होत्या.
त्यानुसार जिल्ह्यातील शैक्षणिक, उद्योग, वैद्यकीय, पर्यटन क्षेत्रासह अन्य महत्वाच्या क्षेत्रातील मान्यवरांची बैठक आज घेण्यात आली. या बैठकीत संबंधित मान्यवरांनी जिल्ह्याच्या सर्वंकष विकासाच्या दृष्टीने मौलिक सूचना मांडल्या. यामध्ये रोजगाराभिमुख प्रशिक्षण व कौशल्य विकास, औद्योगिक उत्पादनांसाठी प्रदर्शन केंद्र, गाव तिथे वाचनालय, औषधी वनस्पती उद्यान, पर्यटन केंद्रांची लघुचित्रफितीच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी, तीर्थक्षेत्री येणाऱ्या पर्यटकांना सोयीसुविधा, कृषि विद्यापीठाची निर्मिती, पर्यावरण संवर्धन, सौरउर्जेचा वापर, जुन्या धर्मादाय रूग्णालयांचे पुनरूज्जीवन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, आयटीहब, स्टार्ट अप, हुतात्मा स्मृती संग्रहालय निर्मिती, कृषिपूरक उद्योग, क्रीडा सुविधा उपलब्ध करून देणे आदिंबाबत मौलिक सूचना उपस्थित मान्यवरांनी केल्या. जिल्ह्याची बलस्थाने शोधून उद्योग, शिक्षण, रोजगार, स्वयंरोजगार, पर्यटन, महिला बचत गट अशा सर्वच क्षेत्रातील विकासाला चालना देण्यासाठी या सूचना उपयोगी ठरणार असून, या सर्वच सूचनांबाबत पालकमंत्री महोदयांना अवगत केले जाईल व त्यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्याच्या विकासासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी यावेळी दिली. प्रारंभी इशाधीन शेळकंदे आणि अंजली मरोड यांनी सादरीकरण केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या