जिल्हा परिषदेमार्फत आयोजित तांदूळ महोत्सवाला उत्सर्फूत प्रतिसाद
B1न्यूज मराठी नेटवर्क
दिवसात अडीच लाख रुपयांची तांदूळ विक्री
पुणे, दि. १३: जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत नवीन जिल्हा परिषद येथे आयोजित एक दिवसीय तांदूळ महोत्सवाला उत्सर्फूत प्रतिसाद मिळाला असून यामध्ये २ लाख ६५ हजार ९०० रुपयांची तांदूळ विक्री करण्यात आली. ‘उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान’ मार्फत महिला स्वयंसहायता समूहातील महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी व त्यांची आर्थिक उन्नती व्हावी या उद्देशाने १२ डिसेंबर रोजी आयोजित तांदूळ महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. या महोत्सवात जिल्ह्यातील मुळशी, मावळ, भोर, हवेली व जुन्नर या तालुक्यामधून १२ महिला स्वयंसहायता समूहांनी भाग घेतला. यामध्ये इंद्रायणी तांदूळ, आंबेमोहोर, कोलम, काळा तांदूळ आणि सर्व प्रकारचा सेंद्रिय पद्धतीने उत्पादित तांदूळ विक्री ठेवण्यात आला होता.सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाचे विकास उपायुक्त विजय कुमार मुळीक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे तसेच विविध विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या महोत्सवास भेट देऊन तांदूळ खरेदी केली.