युवा उद्योजक प्रविण कसपटे राष्ट्रीय उद्योगभूषण पुरस्काराने सन्मानित

B1न्यूज मराठी नेटवर्क
युवा उद्योजक प्रविण कसपटे राष्ट्रीय उद्योगभूषण पुरस्कार प्रदान
बार्शी : जगप्रसिद्ध जॉन डियर ट्रॅक्टर्सचे अधिकृत वितरक असलेल्या मधुबन ट्रॅक्टर्सचे संचालक युवा उद्योजक प्रविण कसपटे यांचा काव्यमित्र संस्थेच्या वतीने राष्ट्रीय उद्योगभूषण पुरस्काराने गौरविण्यातम आले. रविवारी (दि.१८) पिंपरी चिंचवड येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात ज्येष्ठ शास्त्रज्ञ व कुलगुरू पंडित विद्यासागर यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.मधुबन ट्रॅक्टर्सच्या माध्यमातून बार्शी तालुका व उस्मानाबाद जिल्ह्यात १२ शाखांचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करीत प्रविण कसपटे यांनी गतवर्षी तब्बल ६०० ट्रॅक्टर्सची विक्रमी विक्री केली आहे. त्याचबरोबर देशातील एकमेव पेटंटप्राप्त सिताफळ वाण एनएमके-१ च्या फळांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देत सिताफळास सातासमुद्रापार पोहोचविण्यात प्रविण कसपटे यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत काव्यमित्र संस्थेच्या वतीने त्यांना राष्ट्रीय पूरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
काव्यमित्र संस्थेच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती व कर्मयोगी प्रल्हादराव काळबांडे यांच्या द्वितीय स्मृतिदिनाचे औचित्य साधून पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. काव्यमित्र संस्थेचे कार्य देशातील सात राज्यांत सुरू असून यंदा पुरस्काराचे २२ वे वर्ष होते. दरवर्षी शैक्षणिक, सामाजिक व औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या व्यक्तींचा सन्मान संस्थेच्या वतीने केला जातो.
यावेळी व्यासपीठावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता शिरिष पोरेडी, सरसेनापती बाजी पासलकर यांचे वंशज भगवानराव पासलकर, ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रमोद लाड, सेवाभावी उद्योजक भाऊसाहेब जंजिरे आदी उपस्थित होते.