“नोकरी शोधणारे नव्हे तर नोकरी निर्माण करणारे व्हा!” बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेजमध्ये उद्योजकतेचा प्रेरणादायी जागर

0

B1न्यूज मराठी नेटवर्क500000

बार्शी : आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून कौशल्य, आत्मविश्वास आणि उद्योजकतेचा दृष्टिकोन आवश्यक आहे, या विचारातून श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी संचलित बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी या महाविद्यालयामध्ये एक आठवड्याच्या उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण उद्घाटन दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी संपन्न झाले. 23 ते 28 फेब्रुवारी 2026 या कालावधीत होणाऱ्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये “नोकरी मागणारे नव्हे, तर नोकरी देणारे बना” हा आत्मविश्वास जागवण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न महाविद्यालयामार्फत करण्यात येत आहे.

उद्घाटनप्रसंगी बार्शीतील नामवंत उद्योगपती मा. गौतम शेठ कांकरिया हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या सन्माननीय प्राचार्य डॉ. एस. बी. करंडे होते. व्यासपीठावर उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. बी. डी. लांडे, वाणिज्य विभागप्रमुख प्रा. के.बी.चपटे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा एम. ए. ढगे, प्रा. एन. आर. सरफळे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला महाविद्यालयामधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रेरणादायी वातावरणात करण्यात आली. प्रास्ताविकात डॉ. बी. डी. लांडे यांनी या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांनी शिकून फक्त नोकरीच्या मागे न लागता उद्योजकतेकडे वळावे, यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.”

प्रमुख पाहुणे गौतम शेठ कांकरिया यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना उद्योगविश्वातील वास्तव चित्र समजावून सांगितले. “व्यवसाय म्हणजे फक्त नफा नाही; तो धैर्य, सातत्य आणि अपयशाला सामोरे जाण्याची तयारी आहे. ‘मोडेन पण वाकणार नाही’ ही वृत्ती व्यवसायात चालत नाही; परिस्थितीनुसार लवचिकता ठेवून सातत्याने प्रयत्न केल्यासच यश प्राप्त होते,” असे सांगत त्यांनी स्वतःच्या संघर्षमय प्रवासातील अनुभव विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने शेअर केले. त्यांच्या प्रेरणादायी शब्दांनी विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला.50000अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. एस. बी. करंडे यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, “शिक्षणाबरोबरच कौशल्य आणि सकारात्मक दृष्टिकोन जोपासणे गरजेचे आहे. या व्याख्यानमालेतून मिळणारे मार्गदर्शन तुमच्या भविष्यास दिशा देणारे ठरेल.” त्यांनी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाच्या सर्व सत्रांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून स्वतःच्या क्षमतांचा विकास करावा, असे आवर्जून सांगितले.

या कार्यक्रमामध्ये सॉफ्ट स्किल्स, ताण-तणाव व्यवस्थापन, व्यवसाय कायदे, करप्रणाली, उद्योजकतेतील संधी व आव्हाने इ. विविध विषयांवर तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. प्रत्येक सत्र विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योगविश्वाशी जोडणारे आणि आत्मनिर्भरतेकडे नेणारे ठरणार आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.कॉम. भाग २ मधील विद्यार्थीनी शिवानी पवार हिने केले, प्रमुख पाहुण्यांची ओळख बी. कॉम. भाग – 3 चा विद्यार्थी यश रणसुभे याने करुन दिली तर प्रा. एन. आर. सारफळे यांनी आभार मानले. विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची बीजे रोवून स्वावलंबनाचा विचार दृढ करण्याचा हा स्तुत्य उपक्रम असून, या कार्यशाळेतील प्रत्येक सत्र विद्यार्थ्यांसाठी भविष्यातील यशाचा पाया ठरणार आहे. महाविद्यालयाने घेतलेला हा पुढाकार निश्चितच युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा ठरत आहे.50000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या