अन्यायाच्या विरोधातील भूमिका पुढे घेऊन जाण्यासाठी शाहिद कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे विचार समजून घ्यावे लागतील – प्राचार्य डॉ. महेंद्र कदम

0

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृती दिनानिमित्ताने भारतीय कम्युनिस्ट पक्ष सोलापूर जिल्हा कौन्सिल यांच्या वतीने बार्शी मधील आयटक कामगार केंद्र येथे दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर प्रमुख व्याख्याते प्रचार्य डॉ. महेंद्र कदम, प्रमुख उपस्थिती बृहमुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस गणेश बकशेट्टी, जिजाऊ गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष संभाजी घाडगे व कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे हे उपस्थित होते.

‘सारेच दीप कसे मंदावले आता ‘ या विषयाची मांडणी करताना प्राचार्य डॉ. महेंद्र कदम म्हणाले; “जातीचा अंत व्हावा अशी पुरोगामी चळवळीने दिशा निश्चित केली आहे, परंतु जातीचे कटबोळे संपण्यापेक्षा खेड्यांकडे कमी आणि शहरांमध्ये जास्त वाढलेले दिसत आहे, जातीमध्ये कुठलीही पवित्रता शुद्धता नाही तरी देखील त्याचे कौतुक वाढणे दुःखद आहे, एक काळ पक्षाचे महत्त्व होते आज पक्ष बदलणारी माणसेच मोठी होताना दिसत आहेत. विचार न करण्याची प्रक्रिया मजबूत करणे हा राजकारणाचा आजचा अजेंडा आहे. विचार करण्यासाठी शांतता हवी परंतु ती शांतताच संपवण्याचे कारस्थान रचले जात आहे. मार्क्सवादाचे शास्त्र जातवर्ग अंताचे शास्त्र आहे ते मजबूत होणे आवश्यक आहे. जरांगेंच्या आंदोलनकर्त्यांना सिद्धिविनायक मंदिराची दारे बंद होतात हे अमानवतेचे लक्षण आहे. विरोध संपवण्याचे धोरण राजकारणात प्रस्थापित होत चालले आहे. प्रस्थापितांना ठिकान्यावर आणण्यासाठी विस्थापितांच्या अंतर्गत लढाया आपण आपल्या सोडविल्या पाहिजेत. सत्यासाठी व्यवस्थे पुढे शरण न जाने हे मानवतेचे लक्षण आहे त्या विरोधात बहुसंख्या विरोधात आपण गेलो तरी चालेल; परंतु सत्याची कास सोडता कामा नये. अन्यायाच्या विरोधातील भूमिका पुढे घेऊन जाण्यासाठी शाहिद कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे विचार समजून घ्यावे लागतील. चुकीच्या गोष्टींना विरोध करूयात, नव्या वाटा शोधूयात; नवा काळ आपली वाट पाहत आहे.”50000अध्यक्षीय समारोपात कॉम्रेड तानाजी ठोंबरे म्हणाले ; “कॉम्रेड पानसरे यांनी मार्क्सवाद आत्मसात केला; त्या मार्क्सवादी विचारांनी त्यांनी राज्यभर कार्यकर्ते तयार केले, ते स्वतः नावाजलेले वकील होते परंतु महिन्यातून एक आठवडा काम व उर्वरित वेळ कष्टकरी चळवळीसाठी द्यायचा हा त्यांचा नियम होता. उपक्रमशीलता , नाविन्यता स्वीकारून नवनवे प्रयोग चळवळीसाठी करत चळवळीला मजबूत करण्याची दिशा त्यांनी ठरविलेली होती. त्यामुळे नवे प्रबोधन सोबत घेऊन पुढे जाऊयात; कितीही अंधार असला तरी डाव्या पुरोगामी विचारांचे लोक हे आव्हान स्वीकारतील हा विश्वास कॉम्रेड पानसरे यांनी निर्माण केलेला आहे तो विश्वास आपण पुढे घेऊन जाऊयात.”

कार्यक्रमाला गणेश बकशेट्टी व संभाजी घाडगे यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिरुद्ध नखाते यांनी केले, प्रस्ताविक कॉम्रेड डॉ. प्रवीण मस्तुद यांनी केले. यावेळी लहू आगलावे, बालाजी शितोळे, सतीश गायकवाड, राजेंद्र करली, भारत भोसले , भारत चव्हाण, आनंद गुरव, प्रमोद मंडलिक, शांता जाधव, सुवर्णा नेंदाने, विनोद गायकवाड, मुबारक मुलाणी, दीपक भोसले, सुरेश कुंभार आदी उपस्थित होते. तसेच अनिस , मसाप परिषद, एमआर संघटना , प्राध्यापक संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.50000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या