डॉ . राहुल पालके यांच्या पक्षी दूर प्रवासाचे साक्षी या कवितेतून निसर्गाच्या दुरवस्थेचे चित्रण
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : मानव व निसर्ग यांचे अतूट असे नाते आहे. निसर्गाच्या सानिध्यात मानवी मनाचे आकलन होते याचे चित्रण लेखक व कवी यांनी त्यांच्या कलाकृतीतून केलेली आहे.सध्या निसर्गाचा समतोल बिघडलेला आहे.पशु,प्राणी,पक्षी यांच्या जीवास धोका निर्माण होत आहे. हाच विषय घेऊन डॉ. राहुल पालके यांनी ‘पक्षी दूर प्रवासाचे साक्षी’ या कवितेतून पक्ष्यांचे विश्व रेखाटत निसर्गाच्या दुरवस्थेचे चित्रण केलेले आहे.
या कवितेत माणसाच्या स्वार्थी प्रवृत्तीचे पदोपदी चित्रण दिसून येते.माणसे आता बेरकी झाली, माणुसकीला पोरकी झाली या ओळीतून मनुष्याच्या स्वार्थी व अघोरी वृत्तीचे चित्र स्पष्ट होते .सध्याच्या पर्यावरण जगताचे वास्तव प्रकट करताना जागतिक तापमान वाढ हे मोठे संकट ठरलेले आहे.याला थांबवणे कोणत्याही एका देशाच्या हाती नसून ती सर्वांची जबाबदारी झालेली आहे.
माणसाच्या लोभवृत्तीमुळे पशु-पक्षी आणि प्राण्यांच्या आधिराज्यावर गदा येत आहे.निसर्गाची नगरी,लंकेची पार्वती, जटायूची अवस्था, सोन्याची राख या शब्दरचनांमधून निसर्गाच्या कुशीत वसलेल्या पक्षांच्या व्यथेविषयी माहिती मिळते. कवितेतील उरलीसुरली कसर भरली,नक्राश्रूने घागर भरली या ओळीतून माणसाच्या ढोंगी वृत्तीचे दर्शन घडते.
माणसाने निसर्गाच्या क्षेत्रात केलेल्या अतिक्रमणामुळे विविध समस्या निर्माण होत आहेत. हिरव्यागार वनराईचे रूपांतर ओसाड प्रदेशात होत आहे. प्रदूषणाची समस्या बिकट होत आहे. सिमेंटच्या जंगलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. माणसांचे हित पाहणारी पक्ष्यांची रीत साने गुरुजींच्या शिकवणीला साद घालत.जगाला प्रेम अर्पण करीत हे पक्षी दूर प्रवासाचे साक्षी ठरतात, असा विचार डॉ. पालके यांनी कवितेतून प्रकट केलेला आहे.





