गावे हरित करण्याचा संकल्प; पर्यावरण दिनापासून प्रत्येक गावात वृक्ष लागवड

B1न्यूज मराठी नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात वृक्षाच्छादन वाढवून गावे हरीत करण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनाने केला असून जागतिक पर्यावरण दिवस दि.५ जून चे औचित्य साधून प्रत्येक गावात (ग्रामपंचायत) १०० तर नगरपालिका, नगरपंचायत हद्दीत २०० वृक्ष लागवड करण्यात येणार आहेत. त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिला आहे.
यासंदर्भात आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्व उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, सामाजिक वनिकरण, वन विभाग अशा सर्व संबंधित विभागांची आढावा बैठक घेतली. याबैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वन अधिकारी कीर्ती जमदाडे, उपवनसंरक्षक सुवर्णा माने आदी दुरदृष्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते तर जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, निलम बाफना, सर्व तहसिलदार आदी सहभागी झाले होते.
‘सुजाण नागरिक समृद्ध निसर्ग’, असे या नावाने हे अभियान दि.५ ते १५ जून कालावधीत राबविण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी म्हणजेच दि.५ रोजी गावात वृक्ष दिंडी काढून प्रारंभ करण्यात येणार आहे. त्याच दिवशी जिल्ह्यातील प्रत्येक गावात पाच रोपे लागवड करुन या अभियानाचा प्रारंभ करण्यात येईल. प्रत्येक ग्रामपंचायत १०० वृक्ष तसेच नगरपालिका, नगरपरिषद २०० वृक्ष लागवड करतील.
यात नगरपालिका, नगरपरिषद वा ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या शाळा, महाविद्यालयये, अंगणवाडी, शासकीय दवाखाने, शासकीय कार्यालये, शासकीय पडीक जमीन व जिथे पाण्याचा स्त्रोत असेल अशा जागांवर वृक्ष लागवड होणार आहे. गावात स्मशानभुमीत आवर्जून २५ वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.
गटविकास अधिकारी यांनी या कार्यक्रमाचे नियोजन करावयाचे आहे. प्रत्येक गावात तहसिलदार, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, गटशिक्षणधिकारी, वनपिरक्षेत्र अधिकारी, वनविभाग, सामाजिक वनीकरण यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात यावे.
रोपांची उपलब्धता उपवनसंरक्षक वन विभाग यांच्याकडे जिल्ह्यात विविध ठिकाणी २लक्ष ८३ हजार ९६५ रोपे तसेच विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण यांच्याकडे १ लक्ष ५० हजार रोपे असे एकूण ४ लक्ष ३३ हजार ९६५ रोपांची उपलब्धता जिल्ह्यात आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.