समाजाच्या सर्व घटकाला विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेण्याची शासनाची भूमिका – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

शिर्डी : समाजाच्या सर्व घटकाला विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेण्याची शासनाची भूमिका असल्याचे मत राज्याचे जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.

राहूरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या अंतर्गत कोल्हापूरी बंधाऱ्यांच्या उर्वरित कामांचे व विशेष दुरुस्ती कामाचा भूमिपूजन व कोल्हार खूर्द येथील ग्राम सचिवालय नवीन इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अण्णासाहेब म्हस्के पाटील, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता गणेश हारदे, तहसीलदार नामदेव पाटील, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, कोल्हार खूर्दचे सरपंच अनिता शिरसाठ आदी उपस्थित होते.

पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, ग्राम सचिवालय विकासाचे केंद्र असते. नवीन ग्राम सचिवालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या अपेक्षा निश्चितच पूर्ण होतील. कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या दुरूस्ती कामामुळे पाणी गळती थांबणार आहे. पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचे काम शासनाने हाती घेतले असून या कामाचे युद्ध पातळीवर सर्वेक्षण सुरू आहे. निळवंडे धरणामुळे जिल्ह्यातील ६४ हजार हेक्टर क्षेत्रास अतिरिक्त पाणी मिळणार असून पाईपने पाणी दिले जाणार आहे, यामुळे पाण्याची ३० टक्के बचत होणार आहे.

राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेत एकाचवेळी २० लाख घरकुलांचे वाटप ही ऐतिहासिक घटना आहे. यात जिल्ह्यात ८२ हजार घरकुलांचे वाटप होणार आहे. कोपरगाव, राहाता व श्रीरामपूर मध्ये घरकुल योजनेसाठी शेती महामंडळाची जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

शासनाच्या एक रुपयात पिक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांना मदत झाली. सोयाबीन अनुदानही शेतकऱ्यांना मिळाले. लाडक्या बहिणींना दर महिन्याला पैसे मिळत आहेत. पुढील पाच वर्षांत सर्व शेती पंप सौर ऊर्जवर कार्यरत होणार आहेत, असेही पालकमंत्री म्हणाले.

याप्रसंगी कोल्हार खूर्द गावांतील ७६ लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. अण्णासाहेब म्हस्के पाटील, दत्तात्रय शिरसाठ यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक दिगंबर शिरसाठ यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या