श्रावस्ती बुद्ध विहार, बार्शी येथे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा संपन्न

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्ट, बार्शी अंतर्गत मातोश्री रमाई महिला मंडळ बार्शी यांच्या वतीने श्रावस्ती बुद्ध विहार येथे माता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले, माता फातिमा शेख, आणि माता रमाई यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त तसेच ७६व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भव्य महिला सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाऊ, माता सावित्रीबाई, माता फातिमा, आणि माता रमाई यांच्या प्रतिमांचे पूजन दीप, धूप व पुष्पांनी करण्यात आली. पूजन कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्य आशा रोकडे, प्रमुख वक्त्या प्रा. डॉ. अंजना गायकवाड, आणि प्रमुख पाहुणे भिकाजी शिलवंत बप्पा यांच्या हस्ते संपन्न झाला. भन्ते सुमेधजी नागसेन यांनी त्रिशरण, पंचशील आणि बुद्ध वंदनेने कार्यक्रमाला आध्यात्मिक सुरुवात केली.

कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. सन्मानित महिलांमध्ये प्राचार्य आशा रोकडे, प्रा. डॉ. अंजना गायकवाड, पुष्पलता ओमन, प्रा. दीक्षा कदम, प्रा. रोहिणी केदारे, प्रा. डॉ. प्रतिभा शिवशरण, पल्लवी नाईकनवरे, आणि राजश्री कदम यांचा समावेश होता. मान्यवरांनी त्यांच्या कार्याबद्दल प्रशंसा करत त्यांना प्रेरणादायी महिला म्हणून संबोधले.

प्रमुख पाहुणे शिलवंत बप्पा यांनी उपस्थितांना धम्मदानाचे महत्त्व समजावून सांगितले आणि बुद्ध विहार उभारणीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले. प्रा. डॉ. अंजना गायकवाड यांनी माता जिजाऊ, सावित्रीबाई, फातिमा शेख, आणि रमाई यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याचा उल्लेख करत महिला सक्षमीकरणावर भाष्य केले. प्राचार्य आशा रोकडे यांनी बौद्ध समाजावरील अन्यायाची व्याख्या केली आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचा मार्ग सुचवला.

श्रावस्ती बुद्ध विहाराला प्राचार्य आशा रोकडे यांनी ₹१०,००० चे धम्मदान जाहीर केले. यावेळी प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी चेक स्वीकारला. गौतमी उर्फ विरा कांबळे या विद्यार्थिनीने प्रजासत्ताक दिनाच्या महत्त्वावर भाषण करून उपस्थितांचे लक्ष वेधले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेश्मा कदम यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रज्ञा वाघमारे यांनी प्रभावीपणे पार पाडले. शेवटी भन्ते सुमेधजी नागसेन यांनी आशीर्वादपर धम्मदेसना दिली आणि कार्यक्रमाचा समारोप केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्ट आणि मातोश्री रमाई महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. उपस्थित महिलांची संख्या लक्षणीय होती, ज्यामुळे कार्यक्रमाला विशेष उर्जा प्राप्त झाली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या