‘सृजनालय’च्या वंचित मुलांना ‘जीई स्टॅम्प सीएसआर ग्रुप’कडून मदतीचा हात.!

B1न्यूज मराठी नेटवर्क
पुणे : अजित फाऊंडेशनच्या ‘सृजनालयास’ जीई स्टॅम्प सीएसआर ग्रुपच्या वतीने खाद्यपदार्थ आणि शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे वंचित घटकातील मुलांना मायेचा आधार मिळाला असून त्यांच्या भविष्याला नवी दिशा मिळण्यास हातभार लागणार आहे. ही संस्था वंचित समाजातील लहान मुले, तरुण, आणि महिलांचे जीवनमान सुधारण्यासाठी समर्पित आहे. स्थलांतरित आणि सिग्नलवर भीक मागणारी शाळाबाह्य मुले, बेघर अनाथ, एकल पालक, तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांची मुले, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले, आणि कोविडमुळे पालक गमावलेली मुले अशा वेगवेगळ्या पार्श्वभूमी असलेल्या ३२ मुलांचे संगोपन येथे केले जाते.
या संस्थेतील मुलांना स्वावलंबी बनवण्यासाठी कौशल्याधारित आणि व्यावहारिक शिक्षण दिले जाते. संस्थेचे प्रमुख महेश व विनया निंबाळकर या शिक्षक दांपत्याने सरकारी नोकरी सोडून या मुलांना सक्षम बनवण्याचे अतुलनीय कार्य सुरू केले आहे. मुलांना स्वयंपाक, शिवणकाम, प्लंबिंग, विद्युत दुरुस्ती, शेती व रोपवाटिका, बालन्यायालय, मासिक अंदाजपत्रक, तंटामुक्ती समिती, आणि बालसभा यांसारख्या विविध कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते. याचे प्रभावी सादरीकरण मुलांनी करून दाखवले.
याप्रसंगी जी स्टॅम्पच्या एचआर विभागातील विशाल भांगे, बालाजी डोईफोडे, हरीश दीक्षित, नीलेश माने, प्रशांत लांडगे, कुंदन गाडे, संकेत काळोखे, पुनम शिंदे, ऋषिकेश शिंदे, युनियन प्रतिनिधी अमित येळवंडे आदी मान्यवर उपस्थित होते. जीई स्टॅम्प सीएसआर ग्रुप’च्या वतीने यावेळी खाद्यपदार्थ आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. संस्थेतील मुलांनी सादर केलेल्या कौशल्य प्रशिक्षण प्रकल्पांचा अनुभव घेताना जी स्टॅम्पच्या सदस्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.