‘त्या’ वराहांचा मृत्यू असाध्य रोगानेच बार्शीतील वराह मृत्यूची दखल थेट दिल्लीतून

बार्शी नगरपरिषदेच्या गांभीर्यपूर्वक कारवाईमुळे भारतात ‘त्या’ रोगाचे संक्रमण झाल्याचे निष्पन्न
बार्शी : काही दिवसांपूर्वी शहरातील सुभाष नगर स्थित भिसे प्लॉट परिसरामध्ये काही अज्ञात कारणामुळे वराह (डुक्कर) प्रजातीचे अनेक प्राणी अचानकपणे मृत झाल्यामुळे बार्शी नगर परिषदेकडून तात्काळ परिसरातील सर्व वराह मृतदेहांची विल्हेवाट लावण्यात आली होती. तसेच या वराहांच्या अचानक मृत्यूचे कारण समजण्यासाठी सदर मृतदेहांचे नमुने भोपाळच्या ‘राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थान’ (National Institute of High Security Animal Diseases (NIHSAD) Bhopal) या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.
सदर प्रयोगशाळेकडून मिळालेल्या अहवालानुसार त्या वराहांचा मृत्यू ‘आफ्रिकन स्वाईन फीवर’ या लस व उपचार उपलब्ध नसलेल्या असाध्य रोगामुळेच झाले असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच या प्रयोगशाळेकडून राष्ट्रीय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभाग, महाराष्ट्र सरकार, नवी दिल्ली यांना पत्राद्वारे या असाध्य रोगाबाबत कळविण्यात आले आहे. त्यानुसार भारत सरकार द्वारा तयार केलेल्या ‘आफ्रिकन स्वाइन फीवर’ या वराह प्रजातीतील रोगाच्या प्रादुर्भावाबाबत राष्ट्रीय कृती आराखड्यानुसार मार्गदर्शक सूचना प्रसारित करण्यात आलेल्या आहेत.
सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी देखील त्यांच्या विशेष अधिकाराचा उपयोग करीत बार्शीतील वराह मृत्यू बाबत आलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार कार्यवाही करण्याचे विशेष आदेश काढले असून त्यानुसार बार्शी नगरपरिषदेकडून तात्काळ कार्यवाही करत बाधित वराहांच्या मालकांना विश्वासात घेऊन संबंधित वराहांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट देखील लावण्यात आली आहे.
‘आफ्रिकन स्वाइन फीवर’ हा रोग केवळ वराह प्रजातीतील प्राण्यांमध्ये संक्रमित होत असून याचा प्रादुर्भाव इतर कोणत्याही प्रजातीच्या प्राण्यांना किंवा मनुष्यास होत नाही. त्यामुळे नागरिकांनी याबाबत घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे बार्शी नगरपरिषद आरोग्य विभाग प्रमुख शब्बीर वस्ताद यांनी सांगितले.
या वराह मृत्यूंचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ कार्यवाही करत बार्शी नगरपरिषदेने कर्तव्यदक्षतेचे एक उदाहरण स्थापित केले आहे. बार्शी नगरपरिषदेच्या तात्काळ कार्यवाहीमुळेच ‘आफ्रिकन स्वाइन फीवर’चे भारतात संक्रमण झाले असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच या रोगाच्या प्रादुर्भावाबाबत कारवाई करण्याचे आदेश सर्व राज्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे बार्शी नगर परिषदेचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण, आरोग्य विभाग प्रमुख शब्बीर वस्ताद व आरोग्य विभागाची संपूर्ण टीम यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.