बार्शीतील ज्येष्ठ उद्योजक सुरेश कुंकूलोळ लिखित “माझ्या नोंदी व अर्थपूर्ण शोध” या पुस्तकांचा होणार दिमाखदार प्रकाशन सोहळा

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : प्रथितयश ज्येष्ठ उद्योजक सुरेश कुंकूलोळ लिखित माझ्या नोंदी व अर्थपूर्ण शोध या पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन नयन प्रकाशन व बार्शीच्या कुंकुलोळ परिवाराने येथील मोरया फंक्शन हॉल येथे रविवारी (दि.२९) सकाळी साडे दहा वा. करण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांच्या वतीने अजित कुंकुलोळ यांनी दिली.
पुस्तक प्रकाशन ज्येष्ठ विचारवंत व्यकंटेश जोशी, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वृक्षमित्र बाळासाहेब पानसरे,तसेच रेणूकॉर्प ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वानखेडे यांच्या हस्ते आमदार दिलीप सोपल यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून यावेळी ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत मोरे, प्रशासकीय अधिकारी संजय खरात (गुजरात) व व्हॉईस ऑफ मिडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पुस्तक प्रकाशन सोहळ्यात लेखक सुरेश कुंकुलोळ यांच्या ८१ व्या वाढदिवसपूर्ती निमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात येणार आहे. प्रकाशन सोहळ्या निमित्त दोन्ही पुस्तकं सवलतीच्या दरात वाचकांना प्रकाशन स्थळी उपलब्ध केली आहेत तसेच राज्यातील विविध ३५०० ग्रंथालयात तसेच विक्रीसाठी स्टॉलवर ही दोन्ही पुस्तकं लवकरच उपलब्ध करून दिली जातील अशी माहिती अजित कुंकुलोळ यांनी यावेळी दिली. सुरेश कुंकुलोळ यांच्या पुस्तक प्रकाशन व सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यास नागरिकांनी व पुस्तकप्रेमी वाचकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
ठळक वैशिष्ट्य : सुरेश कुंकुलोळ यांनी उद्योग व्यवसाय सांभाळून लेखन व वाचनाची आवड जोपासली आहे. नित्य जीवन जगताना आलेले बरे वाईट अनुभव, समाजात काम करताना घडलेले विविध प्रसंग यांच्या बारीक सारीक नोंदी, निरीक्षण, वाचन यांची सुरेश कुंकुलोळ यांनी मागील सुमारे २५ वर्षापासून डायरीत नोंदी लिहल्या आहेत. हे त्यांचे डायरी लेखन व अनुभवातून आलेली निरीक्षण यांचे सहज सोपी भाषेत सर्वस्तरातील वाचकांना उपलब्ध करण्यासाठी व्हॉईस ऑफ मिडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी पुढाकार घेऊन व्हॉईस ऑफ मिडियाचे राज्य उपाध्यक्ष अजित कुंकुलोळ यांच्या सहकार्याने माझ्या नोंदी व अर्थपूर्ण शोध या दोन प्रेरणादायी व संग्रही ठेवण्या सारख्या पुस्तकांची निर्मिती केली आहे.