राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथकाच्या कारवाईत २३ लाखाहून अधिक रुपयाचा मुद्देमाल जप्त
B1न्यूज मराठी नेटवर्क
पुणे, दि. ८ : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या आदर्श आचारसंहिता कालावधीत पुणे विभागाच्या भरारी पथकाच्या पुणे, अहिल्यानगर व सोलापूर जिल्ह्यातील कारवाईत अवैध हातभट्टी दारू, देशी, विदेशी दारूची वाहतूक, विक्री व इतर साहित्य असे एकूण २३ लाख ७३ हजार ९५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक नरेंद्र थोरात यांनी दिली आहे.
राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथकाच्या कारवाईत १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२४ दरम्यान अवैद्य दारू निर्मिती वाहतूक व विक्रीवर आळा घालण्याच्या दृष्टिने मोहिम आखून पुणे, अहिल्यानगर व सोलापूर या जिल्ह्यातील अवैद्य गावठी हातभट्टी दारू निर्मितीच्या, बनावट विदेशी मद्य निर्मितीच्या तसेच अवैद्य दारू विक्रीच्या ठिकाणावर सातत्याने छापे मारून एकूण २७ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून त्यामध्ये १४ वारस व १३ बेवारस गुन्ह्यांचा समावेश आहे.
या कारवाईमध्ये आतापर्यंत १२ आरोपी विरूद्ध गुन्हे नोंदविण्यात आले असून २६ हजार ८०० लिटर अवैद्य गावठी हातभट्टी दारू निर्मितीचे रसायण, ३ हजार ४३८ लिटर अवैद्य गावठी हातभट्टी दारू, १४४ ब.लि. बनावट मद्य, मद्य वाहतूकीचे ३ वाहने व इतर साहित्य असा एकूण २३ लाख ७३ हजार ९५ रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दुय्यम निरीक्षक व्हि. एम. माने, सहाय्यक दुय्यम निरीक्षक अलिम शेख आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.
यापुढे देखील विधानसभा निवडणूकीच्या आदर्श आचार संहितेच्या पार्श्वभूमीवर अवैद्य दारू व्यवसाय करणाऱ्यावर अशाच प्रकारची कारवाई सूरू राहणार असून कोठेही अवैद्य दारू व्यवसाय सूरू असल्यास राज्या उत्पादन शुल्क कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक ०२०-२९९११९८६ वर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आले आहे.