अन्न व औषध प्रशासनातर्फे भेसळयुक्त अन्न पदार्थांचा २४ लाख रुपयांचा साठा जप्त
B1न्यूज मराठी नेटवर्क
पुणे, दि. ७ : दसरा व दिवाळी सणाच्या कालावधीत अन्न व औषध प्रशासन विभागाने पुणे विभागात व जिल्ह्यात धडक मोहीम राबवून दूध, गाईचे तूप, भेसळयुक्त बटर, स्वीट खवा व वनस्पती आदी अन्न पदार्थांचा एकूण २४ लाख ७ हजार ९१८ रूपयांचा साठा जप्त केला आहे.
दसरा व दिवाळी सणाच्या कालावधीत पुणे जिल्ह्यात ४८ तर अन्न आस्थापनेतून अन्न पदार्थांचे एकूण ५५ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. तसेच गाईचे तूप, भेसळयुक्त बटर, स्वीट खवा, वनस्पती व भगर आदी अन्न पदार्थाचा एकूण १४ लाख ८८ हजार ३९८ रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला.
पुणे विभागात ८३ अन्न आस्थापनांच्या तपासण्या करण्यात आल्या तर अन्न पदार्थाचे एकुण १०२ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. भेसळीच्या संशयावरुन विविध अन्न आस्थापनांवर छापे टाकून जप्ती करण्यात आली. या मोहिमेत भेसळयुक्त अन्न पदार्थाचा ९ लाख १९ हजार ५२० रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. दोन्हीही ठिकाणचे विश्लेषण अहवाल प्राप्त होताच कायद्याप्रमाणे पुढील कारवाई घेण्यात येईल.
ही कारवाई अन्न व औषध प्रशासनचे पुण्यातील सर्व सहायक आयुक्त (अन्न), अन्न सुरक्षा अधिकारी यांनी पार पाडली. सणासुदीच्या दरम्यान विक्री करण्यात येणाऱ्या अन्न पदार्थामध्ये भेसळ संदर्भात काही संशय असल्यास जागरुक नागरीकांनी प्रशासनाचा टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ यावर संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सह आयुक्त (अन्न) सुरेश अन्नपुरे यांनी केले आहे.